दहावी परीक्षेत मिळवले घसघशीत ९६.२० गुण
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
जांब (ता. खटाव) येथील अत्यंत दुर्गम भागातील इयत्ता दहावीत शिकणारी स्वराली गणपत सुतार हिने बोर्डाच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवून खटाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला व आपल्या वडिलांच्या कष्टाचे सार्थक केले . पालकांच्या त्यागाचे व कष्टाचे चीज करण्याचे स्वप्न उराशी बाळगून, बिकट परिस्थितीवर मात करीत दहावीच्या परीक्षेत स्वरालीने केलेल्या उज्ज्वल कामगिरीचे संपूर्ण खटाव तालुक्यात कौतुक होत आहे.
घरचे अठराविश्व दारिद्र्य: आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडीलांचा तोडका- मोडका सुतार व्यवसाय. गणपत सुतार यांच्या वडिलांचे अकाली निधन झाल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपलं आयुष्य काढलं.लहान वयात कुटुंबाची जबाबदारी पडल्याने गणपत यांना शिक्षण सोडून पारंपरिक व्यवसायाकडे वळावे लागले. त्यामुळे आपल्याल्या परिस्थितीमुळे शिकता आले नाही पण मुलींना चांगले शिक्षण द्यायचे असा ठाम निश्चय करून वडील अहोरात्र काबाडकष्ट.जिथे घर चालवण्याची चिंता तिथे मुला-मुलींच्या शिक्षणाचा तर विचारच न केलेला बरा. परंतु वडिलांच्या जिद्दीमुळे स्वरांजलीने केलेला दृढनिश्चय कामाला आला. डोंगराच्या पायथ्याला वसलेल्या जांब सारख्या दुर्गम खेड्यात शाळा सोडली तर आजच्या शहरी भागातील लेकरांना सहज उपलब्ध असलेल्या खाजगी क्लासेसची वानवा आहे .तिने कधी टीव्ही चा वा मोबाईलचा हट्टही केला नाही.
घरात आई सुजाता हिला घरकामात मदत करत तसेच इयत्ता सहावीत शिकणारी छोटी बहिण प्रांजल हिला अभ्यासात मार्गदर्शन करत स्वतः अभ्यासात रममाण होणाऱ्या स्वरालीने इयत्ता पहिली पासूनच अभ्यासात आपली चुणूक दाखवली. शिक्षकांची मने जिंकली.शेणाने सारवलेली भुई व कौलारू घरातील सुतार कामगाराच्या लेकीने केवळ रामेश्वर हायस्कूलच्याशिक्षकांच्या मार्गदर्शनावरच वर्षभर जिद्दीने व अथकपणे अभ्यास करत यशाचा झेंडा रोवला . त्याचबरोबर तिने या अचाट कामगिरीने दुर्गम भागातील विद्यार्थी शहरातील मुलांच्या बरोबरीने नेत्रदीपक यश मिळवू शकतात हे मोठ्या शहरांकडे ओढा असणाऱ्या पालकांना व मुलांना दाखवून दिले आहे.
स्वराली,"हे यश माझ्या मेहनतीचे तर आहेच पण वडिलांनी केलेल्या त्याग, आईने वेळवेळी दिलेले प्रोत्साहन व सर्व शिक्षक वृंद खासकरून ऋतू दीदीने वर्षभर अथकपणे गणित, सायन्स व इंग्रजी विषयांची करून घेतलेली तयारी हे माझ्या यशाचे गुपित आहे. भविष्यात वाणिज्य शाखेतून शिक्षण घेऊन मला सी ए व्हायचं स्वप्न आहे."





Social Plugin