Ticker

6/recent/ticker-posts

राजापूर येथे वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू



 बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

राजापूर ता . खटाव येथील नवामळा येथील वस्तीवर बापुराव बाळू मदने यांची जनावरे बांधली असता सोमवारी रात्री ९वाजण्याच्या सुमारास  वीज पडून म्हैस व दुभती HF गाय दगावल्यामुळे एक लाख अठोतीस हजाराचे  ( १३८००० ) नुकसान झाले असून त्याचा पंचनामा राजापूरचे ग्राममहसुल अधिकारी पाटील यांनी केला आहे .

पुसेगाव (ता. खटाव) व परिसराला सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने सुमारे दोन तास झोडपले. रात्री पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली . चार दिवसांतील हा तिसरा  मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. खरिपाच्या सुगीची लगबग या पावसाने सुरू होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात आले लागवडीसाठी शेतकरी आतुर झाला आहे. दरम्यान, पुसेगावातील मुख्यबाजारपेठेतून जाणाऱ्या सातारा-लातूर महामार्गाच्या दुतर्फा नाले नसल्याने रस्त्यालगतच्या दुकानांत पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दुकान मालकांसह आठवडा बाजारातही सर्वांची धांदल उडाली.लवकरच खरिपाचा हंगाम सुरू होणार असल्याने शेतकरी वर्ग लगबगीत असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी गेल्या महिन्यातच शेताची नांगरट पूर्ण झाली आहे. सध्या झालेल्या पावसाने खरीपपूर्व शेती मशागतीच्या कामाला गती येणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

पुसेगावात सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्याचे कामसरू झाल्यापासून उच्च दर्जाच्या कामासाठी विविध आंदोलने, पत्रव्यवहार, बंद आदींच्या माध्यमातून संबंधित ठेकेदाराला गावकऱ्यांनी सातत्याने जाब विचारण्याचा प्रयत्न केला; पण मनमानी कारभार करणाऱ्या मुजोर ठेकेदाराने तीन वर्षे लोटली तरी पुसेगाव हद्दीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या बंदिस्त गटारांचे काम अद्यापही केलेले नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी मुसळधार पावसाचे रस्त्यावरून वाहणारे पाणी बाजूच्या घरांत व बाजारपेठेतील दुकानांत घुसल्याने नुकसान होत आहे. ठेकेदार कंपनीच्या कारभाराविरोधात दुकानदार व नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.