Ticker

6/recent/ticker-posts

झरी-जामनी: पाटण महावितरण केंद्राचा भोंगळ कारभार; नागरिक त्रस्त



झरी-जामनी: प्रतिनिधी

 पाटण येथील 33/11 केव्ही महावितरण केंद्राचा कारभार सध्या अत्यंत भोंगळ पद्धतीने सुरू असून, दिवसभर व रात्रभर लाईन सतत बंद व सुरू होत असते. लाईन नेमकी केव्हा जाते आणि केव्हा येते, याची माहिती कुणालाही राहत नाही.

विशेष म्हणजे, या केंद्रावर जास्तीत जास्त कंत्राटी लाईनमन आणि ऑपरेटरच कार्यरत असून, शासकीय कर्मचारी केवळ बसल्या जागेवरून आदेश देताना दिसतात. उन्हाळ्याचे कडाक्यामुळे नागरिक, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध, प्रचंड त्रस्त झाले आहेत.

दुकानदार, पानटपरीधारक यांच्यासाठी लाईट हा अत्यावश्यक घटक असून, लाईट नसल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प होतो आहे. लाईन गेल्यावर विचारल्यास, "लाईन बोरी ते पाटण दरम्यान फॉल्ट आहे," असे उत्तर दिले जाते, मात्र फॉल्ट नेमका कधी आणि कुठे आहे, याचे कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही.

एकीकडे महावितरणकडून लाईटबिल थकवल्यास तत्काळ लाईन कट केली जाते, तर दुसरीकडे वेळेवर पैसे भरूनही योग्य सेवा मिळत नाही, ही मोठी विडंबनात्मक बाब आहे. नागरिकांनी या सगळ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.