गतिरोधकाचा अभाव ठरतोय अपघाताचे कारण
पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
कारंजा येथील वीर सावरकर चौकात वारंवार अपघाताच्या घटना घडत असून, गतिरोधकाचा अभाव हे त्यासाठी प्रमुख कारण ठरत आहे. वीर सावरकर चौकातून वाहनधारकांना नागपूर, संभाजीनगर, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ अशा जिल्ह्याच्या ठिकाणाकडे जाणे शक्य होते. अलीकडेच कारंजा ते खेर्डा बु. कडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्याने हा रस्ता गुळगुळीत झाला आहे. याखेरीज नागपूर - संभाजी नगर या रस्त्याची अवस्था देखील चांगली आहे. त्यामुळे या चौकातून भरधाव वेगात वाहने धावतात. ज्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत असून, हा चौक अपघाताचे केंद्र म्हणून ओळखला जावू लागला आहे. विशेष म्हणजे चारही दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर कुठेही मोठे गतिरोधक टाकल्याचे निदर्शनास येत नाही. परिणामी या चौकात आल्यानंतरही वाहने आपला वेग कमी करत नाही. परिणामी याठिकाणी अपघात होण्याच्या आजवर बऱ्याच लहान, मोठ्या घटना घडल्या असून, अनेकांना प्राण गमवावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले आहे.
अनेकदा एकाच वेळी चारही दिशेकडून वाहने या चौकात येतात. अशावेळी चालकाचा या चौकातून वाहन काढताना गोंधळ उडतो. त्यामुळे गाड्यांची टक्कर होते. काही महिन्यांपूर्वी अशातून एक खाजगी बस दुभाजकावर चढल्याची घटना घडली होती. तसेच एका घटनेत दोन ट्रक भिडल्याची तर एका घटनेत ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या या चौकात घडणाऱ्या अपघाताच्या घटनेचे प्रमाण अधिक आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.
दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांचा गोंधळ येथील वीर सावरकर चौक अतिशय वर्दळीचा आहे. या चौकातून दररोज हजारो वाहने धावतात. या चौकातून समृद्धी महामार्ग गाठणे शक्य होते. शिवाय वेगवेगळे जिल्हे, तालुके आणि गावे गाठण्यासाठी या चौकातून जावे लागते. पण या चौकात कुठेही दिशादर्शक, नामफलक आढळून येत नाही. त्यामुळे अनेक वाहनधारकांना विचारून आपला पुढील प्रवास करावा लागतो. नामफलक नसल्याने या चौकात आल्यानंतर वाहनधारकांचा चांगलाच गोंधळ उडतो. याकडे लक्ष देण्याची मागणी वाहनधारक संबंधीत विभागाला करीत आहेत.





Social Plugin