Ticker

6/recent/ticker-posts

काद्यांच्या दराने केला शेतकऱ्यांचा वांदा



▪️ कांदा ऐरणीत , काद्यांला कवडीमोल भाव

▪️ खटाव तालुक्यातील शेतकरी अडचणीत


बुध , दि.  [ प्रकाश राजेघाटगे ] 

 खटाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे . कांदा उत्पादन पिकांसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने आणि बाजार भाव गडगडल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली असून दराने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा केला असून कांदा ऐरणीत ठेवल्याशिवाय शेतकर्यांना पर्यायच शिल्लक राहिला नाही .

             शेतकऱ्यांचा कांदा शेतातून निघून महिना झाला आहे. कवडी मोल दहा ते १५ रुपये दर मिळत असल्याने शेतकर्यांची आर्थिक कोंडी झाली आहे . कवडी मोल बाजारभावामुळे शेतकर्यांच्या पदरात काहीच पडत नसल्यामुळे त्यांच्यात तिव्र नाराजी दिसून येत आहे .

          आजमितीला शेतकर्यांची अपेक्षा हीच आहे की गेलेला खर्च तरी निघावा. यासाठी शेतकरी धडपडत आहेत परंतू किलोला १२ ते १५ रुपये दरामुळे शेतकऱ्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे . सांगली , हुबळीच्या मार्केट मध्ये शेतकर्यांची बऱ्याच वेळा फसवणूक झाली आहे . भाडयाने वाहन करून गेल्यानंतर वाहनांचे पैसेही निघत नाही .      आजचा दर न परवडणारा असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांनी आपल्या शिवारात , घराशेजारी कांद्याच्या ऐरणी लावून दर वाढण्याची वाट बघत आहेत .

         ऐरणी मधील कांदा साठविण्यासाठी योग्य तापमान आणि आर्द्रता योग्य आहे की नाही  याचीही काळजी शेतकर्यांना घ्यावी लागत आहे . काद्यांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी व खराब होणार नाही या कडे लक्ष द्यावे लागत आहे. कांद्याला चांगला दर तसेच योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहवी लागणार आहे . त्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलून शेतकर्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी मागणी बळीराजा करू लागला आहे .


शेतकर्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे ...

 महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देवून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे . पूर्वी सर्व शेती मशागती स्वस्त होत्या सर्व बियाणांचा खर्चही कमी होता. पण आत्ता सर्व खते , बियांणांचा , मशागतीचा खर्च बळीराजाला परवडणारा नाही . उत्पादन खर्चही निघत नाही . तरी शासनाने कांद्यासह इतर पिकांना योग्य तो भाव मिळवून दयावा .शेतकरी - विकास त्रिपुटे बुध