Ticker

6/recent/ticker-posts

सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने भाषा अभ्यासक डॉ रमेश सूर्यवंशी यांचा सत्कार



डॉ.यशवंत पवार @छत्रपती संभाजीनगर

सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा कन्नड तालुका यांच्यावतीने भाषा अभ्यासक डॉ रमेश सूर्यवंशी यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, लेखाधिकारी शरद भिंगारे, डॉ रमेश सूर्यवंशी, प्राचार्य राहुल क्षीरसागर, ॲड कृष्णा जाधव आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मानपत्र देऊन डॉ रमेश सूर्यवंशी यांचा सरकार करण्यात आला.

या वेळी बोलतांना  कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी, मराठवाडी, झाडीबोली, खानदेशी, नागपुरी याशिवाय गोंडी, बंजारा, कोलामी या बोलीभाषांनी मराठी भाषेला बळ दिले आहे. या बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध होत आहे. 

या वेळी ते पुढे म्हणाले की, भाषाशास्त्रविषयीचे काम करणे हे कष्टाचे असते. डॉ सूर्यवंशी यांनी अहिराणी या अलिखित बोलीचा शब्दकोश, म्हणी वाक्यप्रचार कोश, ओवी कोश, अहिराणी सुलभ व्याकरण आदी पुस्तके आपल्या अभ्यासातून सिद्ध केली.डॉ रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी बरोबरच ठाकर,  गवळी, भिल्ल या आदिवासी बोलींच्या अभ्यास केला. बोली भाषेच्या अभ्यासकाला डॉ रमेश सूर्यवंशी यांनी केलेल्या अभ्यासाचा संदर्भ घेण्याशिवाय पुढे जाता येणार नाही. 

       "या वेळी शरद भिंगारे हे डॉ. रमेश सूर्यवंशी यांच्या साहित्यावर भाष्य करताना म्हणाले की, " डॉ सूर्यवंशी यांनी केलेल्या बोलींच्या अभ्यासाने, ती बोली बोलणाऱ्यांना आत्मविश्वास प्राप्त झाला. अहिराणी ठाकर, गवळी आणि भिल्ल यांच्या बोलीच्या अभ्यासामुळे केवळ त्या बोलीला बळ दिले नाही तर वंचित माणसांच्या जगण्याला सुद्धा बळ दिले."

आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ रमेश सूर्यवंशी आपल्या भाषणात म्हणाले की, " शासनाने माझ्या भाषा अभ्यासाची दखल घेऊन मला पुरस्कार दिला. खरतर मला काम करताना त्या त्यावेळी ज्या अडचणी आल्या त्या गरजेतून मी हा भाषाशास्त्राचा अभ्यास केला.

       या बरोबरच कन्नड तालुक्यातील किल्ले, वाडे, पर्यटन स्थळे, गौताळा अभयारण्य यांचा मी अभ्यास करून कन्नड येथील पर्यटनाला चालना देण्याचे काम केले. भविष्यातही अजून भाषा आणि बोलींविषयी माझा काम करायचा मानस आहे. सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय यांनी सत्कार केला त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मानपत्र वाचन डॉ रूपेश मोरे यांनी केले. 

संजय त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केले ,तर नरेश सोनवणे यांनी आभार मानले.  या कार्यक्रमाला प्रा. रंगनाथ लहाने, प्रा. शिवाजी हुसे, कालिदास उपासनी, प्रा. रामचंद्र झाडे, प्रा.विजय भोसले, जितेंद्र ढोणे, गणेश आहेर, प्रशांत शिंदे, लक्ष्मण वाल्डे ,श्रीमती भुसारे  ऋषिकेश शिवदे, सावन पवार, रवी भागवत आदींची उपस्थिती होतीं.

       या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मानपत्र देऊन डॉ रमेश सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.