बुध दि .[प्रकाश राजेघाटगे]
जीवनात शाश्वत काहीच नाही. जीवनात भक्तिमार्ग महत्वाचा असून आत्मिक समाधानासाठी अध्यात्माची आवश्यकता असल्याचे काशी पीठाचे श्रीमद जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी यांनी सांगितले.
शिवपुरी ता.पाटण येथे ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी आयोजित धर्मसभेत ते बोलत होते.याप्रसंगी श्री ष.ब्र.१०८ शिवलिंग शिवाचार्य महाराज बेळंकी , श्री ष.ब्र.१०८ मणिकंठ शिवाचार्य महाराज लक्ष्मी दहिवडी, सोलापूर येथील सिध्देश्वर वेदपाठशाळेचे जगदीश शास्त्री प्रदीप शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. अविनाश जंगम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .
शिवपुरी येथे काशी जगद्गुरुंच्या दिव्य अड्डपालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जगदगुरुंच्या हस्ते येथे वीरभद्र सिध्देश्वर बाणलिंग , गणेश , हनुमान , लक्ष्मी आदि विविध देव देवतांच्या मूर्तीची स्थापना प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच सेवा देणारे दाते व मान्यवरांचा सत्कार ही करण्यात आला. शिवदीक्षा विधी ही धार्मिक वातावरणात पार पडला यावेळी श्री मणिकंठ शिवाचार्यांनी अय्याचार विधीप्रसंगी जंगम बटूंना, वीरशैवांना शिवदिक्षा दिली. सुमारे ६५ लोकांनी शिवदीक्षा घेतली. श्री मणिकंठ शिवाचार्यांनी शिवदीक्षेचे महत्व समजावून सांगितले. शिव दीक्षा हा संस्कार असून वीरशैव परंपरा जतन करण्याचा मार्ग आहे. आपली संस्कृती व संस्कार आचरणात आणण्यासाठी बंधनाची आवश्यकता आहे. वीरशैवांनी शिवदीक्षा घेणे आवश्यक आहे .याप्रसंगी बेळंकीकर महाराज म्हणाले, मठ ,मंदिरे आश्रमांची परंपरा अनादी काळापासून चालत आली आहेत. मंदिरे ही ऊर्जेची आध्यात्मिक केंद्रे आहेत. शिवमुखातुन वीरशैव पंचाचार्य निर्माण झाले असून गोत्र पुरुष माहेश्वर जंगम आहेत. वीरशैव लिंगायत धर्मात गुरु ,लिंग व जंगम यांना महत्वाचे स्थान आहे. यावेळी महेश जंगम शास्त्री , रवींद्र जंगम , शांताराम जंगम यांनी मनोगत व्यक्त केले. अनुराधा जंगम व अविनाश जंगम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त जंगम बांधवांनी परिश्रम घेतले.





Social Plugin