बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
पुणे-बंगळूरू महामार्गावरील शिरवळ (ता.खंडाळा) येथे मध्यरात्री एकच्या सुमारास चारचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
वेदांत अर्जुन वारिंगे (वय-१९ रा.तळेगांव दाभाडे ता.मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (वय १९ रा. टाकवे ता.मावळ), सोनसिंग धीरेंद्र ठाकूर (वय १९) व निखिल बाळू राऊत (वय २० दोघे रा.कामशेत ता.मावळ) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. चालक मयूर हनुमंत शिंदे (वय 20) व शेजारी बसलेला दीक्षित दयानंद पुजारी (वय 20, दोघे रा. कामशेत, ता. मावळ) हे गंभीर जखमी झाले.
यामध्ये, मुळशी तालुक्यातील हे तरुण आपल्या चारचाकीतून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. दरम्यान त्यांची चारचाकी (एम.एच.१२ एल.जे.३०३३) शिरवळ हद्दीमध्ये आली असता वाहनाचा वेग भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी चारचाकी डिव्हायडरला धडकून तीन-चार वेळा पलटी होत विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली व समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर जाऊन जोरदार आदळली. ही धडक एवढी भीषण होती की चारचाकीचा चक्काचूर झाला.
या अपघातामध्ये चारचाकीमध्ये पाठीमागे बसलेल्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चालक मयूर हनुमंत शिंदे (वय-२०) आणि दीक्षित दयानंद पुजारी (वय-२०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती कळताच शिरवळ पोलिस, स्थानिक युवक व शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच मृतदेह व जखमींना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर राबवले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.
या भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी अंत झाल्याने मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी ट्रकचालक शिवकुमार देवांगत याने दिलेल्या फिर्यादीवरून चारचाकी चालक मयूर शिंदे याच्यावर शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खामगळ हे करीत आहेत.





Social Plugin