Ticker

6/recent/ticker-posts

शिरूर बसस्थानक बीओटी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; भविष्यात सिन्नरसारखी दुर्घटना होण्याची शक्यता – अनिल बांडे



शिरूर ग्रामीण प्रतिनिधी - (शैलेश जाधव)

काल सिन्नर येथील बसस्थानकाचा प्लॅटफॉर्म पावसात कोसळून शिवशाही बस आणि अल्टो कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना समोर येताच राज्यभरात बीओटी (बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर) तत्वावरील बसस्थानकांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील बीओटी तत्वावरील बसस्थानकाचाही मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

२०१२ मध्ये तत्कालीन आमदार व सद्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर बसस्थानक बीओटी तत्वावर विकसित करण्याचा मानस व्यक्त केला होता. २०१४ मध्ये त्याचे उद्घाटनही करण्यात आले. परंतु केवळ ११ वर्षांतच या स्थानकाची जी अवस्था झाली, ती डोळ्यात अंजन घालणारी आहे.

शिरूर बसस्थानकाच्या बीओटी प्रक्रियेची सुरुवात २०१३ मध्ये टपऱ्या हटवून आणि हुडको कॉलनीतील घरांवर बेकायदेशीरपणे बुलडोझर चालवून झाली. यानंतर ६ जून २०१३ ला शहरातील ४५० टपऱ्या हटवल्या गेल्या आणि बीओटीला मार्ग मोकळा झाला. याला स्थानिक विरोधकांनी जोरदार विरोध केला. संजय पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बाब पोहोचवली होती.

त्यातून स्थगितीही मिळाली, पण ती फक्त २३ दिवस टिकली. विधानसभा निवडणुकीपूर्वीच भव्य भूमिपूजन झाले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत तेव्हाचे सत्ताधारी नेते पराभूत झाले. त्यानंतर काही काळ हा विषय थांबला. पण २०१९ मध्ये पुन्हा एकदा बीओटीच्या नावाखाली ५ एकर १६ गुंठे क्षेत्र खासगी विकसकाच्या घशात गेले.

सध्या हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. दरम्यान, अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत – नैसर्गिक प्रवाह अडवणं, संरक्षक भिंतींची अर्धवट स्थिती, प्रवाशांच्या अंगावर प्लॅस्टर कोसळणं, बेकायदा सीएनजी स्टेशन, जाहिरातीचे फ्लेक्स, रस्त्यावर खड्डे, अस्वच्छ परिसर आणि दुर्गंधीयुक्त मुताऱ्या-सौचालयं.सिन्नरप्रमाणेच शिरूर बसस्थानकाचाही दर्जा हा भविष्यात धोक्याचा ठरू शकतो, असा इशारा शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी दिला आहे.