Ticker

6/recent/ticker-posts

सेवागिरी ट्रस्टच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात नऊ जोडपी विवाहबद्ध



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे]

 पुसेगाव  येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेल्या गोरगरीब वधू-वरांच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात मंगळवारी (ता. २०) दुपारी २ वा. ४४ मि. नऊ जोडप्यांवर अक्षता पडल्या. यापूर्वी अनेकदा ट्रस्टने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.

श्री सेवागिरी महाराज मंदिराच्या प्रांगणात नेटक्या स्वरूपात हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. सर्व वधू-वरांना रेशीमगाठी बांधताना शुभाशीर्वाद देण्यासाठी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

विवाह सोहळ्यापूर्वी सकाळपासून सेवागिरी मंदिराच्या आवारात ‘लगीनघाई’ दिसत होती. सकाळनंतर भोजनावळी सुरू झाल्या. सायंकाळपर्यंत हजारो वऱ्हाडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. विधिकार्याची स्वतंत्र व नियोजनबद्ध व्यवस्था केली होती.

या सोहळ्याचा सर्व खर्च देवस्थान ट्रस्टने केला. वधू-वरांच्या पालकांना कोणताही खर्च करावा लागला नाही. वधू-वराचा पोशाख, संसार उपयोगी साहित्य, वऱ्हाडी मंडळास भोजन, फोटो आदी खर्च देखील ट्रस्टने केला. दरम्यान, 'हुंडा बंदी' व 'लेक वाचवा'ची शपथ सर्वाना देण्यात आली. 

आजच्या काळात मुलीच्या आई-वडिलांची आर्थिक स्थिती मोठी कठीण झाली आहे. मुलीच्या विवाहासाठी वडिलांना कर्जबाजारी व्हावे लागते. या खर्चाला फाटा देऊन सामाजिक एकोपा राखण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज बनली असल्याचे मत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.