Ticker

6/recent/ticker-posts

शिरूर नगरपरिषदेची निष्क्रिय शववाहिनी – विजय नरके यांचा प्रशासनाला जाब



शिरूर ग्रामीण प्रतिनिधी - (शैलेश जाधव)

शिरूर नगरपरिषदेच्या निष्क्रिय शववाहिनीमुळे नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही शववाहिनी नगरपरिषदेच्या एका गोडाऊनमध्ये निष्क्रिय अवस्थेत आढळून आली असून, समाजसेवक विजय नरके यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत प्रशासनाला जाब विचारला आहे.

विजय नरके म्हणाले, "जनतेच्या मूलभूत गरजांकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे. शववाहिनी ही कोणत्याही नगरपरिषदेसाठी अत्यावश्यक सेवा आहे. एक मृत व्यक्तीचा सन्मानाने अंत्यसंस्कार होणे ही समाजाची जबाबदारी आहे. पण हीच सेवा निष्क्रिय असेल तर प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे ते मोठे उदाहरण आहे. प्रशासनाने तातडीने ही शववाहिनी दुरुस्त करून ती जनतेच्या सेवेत आणावी."

ही शववाहिनी आमदार अनिल भोसले यांच्या निधीतून प्राप्त झाली होती, मात्र सध्या ती पूर्णपणे निकामी झाली आहे. नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी खाजगी वाहने वापरण्याची वेळ येत असून, त्याचा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ॲम्बुलन्स सेवाही शव वाहतुकीस नकार देत असल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

विजय नरके यांच्या सोबत प्रितेश फुलडाळे आणि राजेंद्र महाजन या सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणात पुढाकार घेत नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.