Ticker

6/recent/ticker-posts

श्री सेवागिरी ट्रस्टतर्फे शकुंतला खटावकरांचा सन्मान



बुध    दि [प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव येथील सुकन्या कबड्डीच्या उत्कर्षासाठी संपूर्ण आयुष्य झगडणाऱ्या ज्येष्ठ कबड्डीपटू आणि संघटक शकुंतला खटावकर यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने त्यांचा सन्मान केला.

येथील श्री सेवागिरी महाराज मंदिरात सत्काराचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, उपसरपंच विशाल जाधव, प्रदीप जाधव, सुसेन जाधव, जयदेव डेव्हलपर्सचे सचिन चव्हाण, सचिव विशाल माने आदी मान्यवर उपस्थित होते.

पुसेगावसारख्या ग्रामीण भागातून पुण्यात जात कबड्डीपटू म्हणून कारकीर्द गाजविणाऱ्या शकुंतला यांनी १९७०-७१ ते १९८१-८२ या कालावधीत आपल्या खेळाने कबड्डीची मैदाने गाजवली होती. कारकीर्दीत १०६ राष्ट्रीय कबड्डी सामने खेळण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या कारकिर्दीत आठ वेळा महाराष्ट्राने राष्ट्रीय विजेतेपद मिळविले आहे. यापूर्वीही शासनाने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली असून १९७६ मध्ये श्री शिवछत्रपती तर १९७८ मध्ये अर्जुन क्रीडा पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

दरम्यान, वयाच्या ७४ व्या वर्षी कबड्डीच्या मैदानावर तेवढ्याच उत्साहाने वावरणाऱ्या शकुंतला खटावकर यांनी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आणि पुसेगाव ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. गावकऱ्यांनी शाबासकीची थाप दिल्याने आणखी काम करण्याचा हुरूप आला असून आपण इतक्यात तरी थांबणार नाही. तसेच पुसेगावचे नाव उंचावण्यासाठी कायम प्रयत्न करत राहीन, असे शकुंतला यांनी सांगितले. यावेळी विश्वस्त रणधीर जाधव, संतोष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.