मितेश जैन - कल्याण प्रतिनिधि
डोंबिवली- डोंबिवली येथील एन.जी स्केटिंग अकॅडेमीच्या स्केटर्सनी इंडोनेशियातील सेमारंग येथील जातीदिरी आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंक येथे आयोजित 'चॅम्प ऑफ चॅम्प २०२५' या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पोर्ट्स एलपीयू भारतीय संघाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत एकूण १ सुवर्ण, २ रौप्य आणि ६ कांस्यपदके मिळवली आहेत. सेमारंग येथील स्पर्धेत अनेक देशांतून एकूण ८९६ खेळाडूंचा सहभाग होता. यामध्ये भारतातील १३ खेळाडूंचा समावेश होता त्या पैकी ६ खेळाडू हे एन जी स्केटिंग अकॅडेमीचे होते. तसेच या खेळाडूंची ऑगस्ट महिन्यात फुकेत थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पीड स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी गोव्याला या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचण्या स्पोर्ट्स एल यु पी या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सर्व विजेत्यांना आंतरराष्ट्रीय प्रायोजकत्व म्हणून रु. ३०,०००/-, रु. २०,०००/- व रु. १०,०००/- देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय इंडोनेशिया स्पर्धेचा या स्पर्धेत पदके जिंकलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये नक्ष नरेश घुंगरी - ११ वर्ष, २ कांस्यपदके , स्वराज अमित उबाळे -९ वर्ष, २ कांस्यपदके , वेदिका विजय चौगुले - ८ वर्ष,१ रौप्यपदक व १ कांस्यपदक , श्रिषा विनीत संदंशिव वय - १० वर्ष, १ सुवर्णपदक , ओम अरविंद दळवी वय - ९ वर्ष, १ रौप्यपदक , अविघ्ना अमर आंबेडे वय – ८ वर्ष, १ कांस्यपदक.
एन.जी स्केटिंग अकॅडेमीचे हे सहा ही खेळाडू आपल्या खेळ कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. या खेळाडूंना इंडोनेशियाच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी प्रशिक्षकांनी विशेष तयारी करून घेतली. विजेत्या खेळाडूंच्या यशामध्ये प्रशिक्षक सुरभि घुंगरी व नरेश घुंगरी यांचे मोलाचे योगदान आहे. मुंबईतील शिव छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावर संघाच्या आगमनावेळी सर्व विजेत्यांचे जल्लोषात स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी स्पोर्ट्स एल यु पी संघटनेचे पदाधिकारी, खेळाडूंचे कुटुंबीय आणि क्रीडा प्रेमी उपस्थित होते. एन जी स्केटिंग अकॅडेमी या क्लबने खेळाडूंना सर्वोत्तम सुविधांची उपलब्धता करून दिली. तसेच, खेळाडूंच्या आहार आणि फिटनेसवरही विशेष लक्ष दिले गेले. एन जी स्केटिंग अकॅडेमीच्या यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





Social Plugin