शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - ( शैलेश जाधव )
शिरूर नगरपरिषद हद्दीत भटक्या व मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. विशेषतः गुजरमळा परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत असून, या त्रासाविरोधात आता सामाजिक संस्था उघडपणे आक्रमक होत आहेत.
भुमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी नगरपरिषदेवर सडकून टीका करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.शहरात कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांवर संकट ओढवले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी झाले आहेत. गेल्या काही वर्षांत नगरपरिषदेने नेमकी कोणती कारवाई केली, याचा खुलासा नागरिकांना अपेक्षित आहे," असं सुशांत कुटे म्हणाले.“नागरिक कर भरतात, पण मूलभूत सेवा मिळत नाहीत. नगरपरिषदेचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलतात. मोहीम केवळ कागदावरच आहे, प्रत्यक्षात काहीच घडत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
शहरातील नागरिक आता सुरक्षिततेच्या चिंतेत असून, नगरपरिषदेच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने फक्त आश्वासनांवर न थांबता तात्काळ कृती करावी, अशी कडवट मागणी कुटे यांनी केली.याचबरोबर, कुटे यांनी प्रशासकांवरही टोकाची टीका करताना म्हटलं की, "नगरपरिषदेमध्ये सध्या प्रशासक कार्यरत असताना देखील या गंभीर प्रश्नाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जात आहे. प्रशासक फक्त मलिदा मिळणाऱ्या कामांमध्येच रस घेत असून, काही विभाग 'कमिशन'मध्ये व्यस्त आहेत, आणि सामान्य शिरूरकर मात्र समस्यांनी हैराण आहेत."
या परिस्थितीवर तात्काळ लक्ष न दिल्यास, भुमिपुत्र प्रतिष्ठानतर्फे नगरपरिषदेला प्रतिकात्मक ‘रेबीज लस’ भेट देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.





Social Plugin