Ticker

6/recent/ticker-posts

होमगार्डच्याच गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली तर सर्वसामान्य महिलांचे काय? — पोलिसांसमोर मोठे आव्हान



शिरुर ग्रामीण प्रतिनीधी – (शैलेश जाधव)

 शहरातील पोलीस विभागाशी संबंधित असलेल्या महिला होमगार्डच्याच गळ्यातून वाढदिवसाच्या दिवशीच ७० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरांनी जबरदस्तीने हिसकावले! ही घटना घडली प्रितमप्रकाश नगर परिसरात, आणि त्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सामान्य महिलांमध्ये मोठी भीती पसरली असून, "होमगार्ड महिला सुरक्षित नाही, तर आमचं काय?" असा संतप्त सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे.

चंदाबाई बबन चव्हाण (वय ५५) यांनी वाढदिवसानिमित्त घराजवळ जेवणावळीचे आयोजन केले होते. रात्री उशिरा हात धुण्यासाठी पार्किंगमध्ये गेल्या असता दोन अनोळखी तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून न्हावरा फाटा हायवेकडे दुचाकीवरून पळ काढला. या घटनेमुळे शहरातील महिला सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

विशेष बाब म्हणजे, चंदाबाई यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात फ्लेक्स लावले होते. त्यामध्ये त्यांच्या गळ्यातील दागिने ठळकपणे दिसत होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी शिकार शोधून नियोजनबद्ध चोरी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत असून, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरु आहे.


पोलिसांसमोर खुलं आव्हान:-

शहरात महिलांवरील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आता पोलीस यंत्रणेवर थेट आव्हान फेकणाऱ्या चोरट्यांना पकडण्याची जबाबदारी वाढली असून, नागरिकही कारवाईची मागणी करत आहेत.

महिला सुरक्षा ही केवळ वैयक्तिक नाही, तर सामाजिक जबाबदारी आहे. या घटनेनंतर शिरूर शहरातील पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांना जेरबंद करणे आवश्यक आहे, अन्यथा गुन्हेगारांचा आत्मविश्वास आणि महिलांचा असुरक्षिततेचा भाव वाढतच राहील.