साहेबराव अंभोरे @ग्रामीण प्रतिनिधी
मेहकर : पांगरखेड येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सुकनंदन हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी खिल्लारी जोडीने सजविलेल्या २ बैलगाड्यांमध्ये नवोदित विद्यार्थ्यांना बसवून गावातून उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये गावातील शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सदस्य,वारकरी भजनी मंडळ, छोटे बालवारकरी,गावातील अनेक प्रतिष्ठित लोक, सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी,अंगणवाडी सेविका, मदतनीस, पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी, आरोग्य सेविका,आशा वर्कर्स यांनी सहभाग नोंदविला.
नवोदित विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे, बालवारकऱ्यांची दिंडी व खिल्लारी जोडीतील सजवलेली बैलगाडी प्रभात फेरीचे प्रमुख आकर्षण ठरले.प्रभातफेरीनंतर शाळेमध्ये चिमुकल्यांना पुष्पगुच्छ, गणवेश, बुट व पाठ्यपुस्तक देण्यात येऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पौष्टीक गोड शिरा व मसालभात देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी नवागतांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
Social Plugin