Ticker

6/recent/ticker-posts

उत्तर कोकणात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस

 


दक्षिण कोकणात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी


 अलिबाग (रत्नाकर पाटील)

यंदा उत्तर कोकणात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. तर दक्षिण कोकणात सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. रत्नगिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. तर रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सरासरची पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतो. त्यातही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. यंदा मात्र या दोन जिल्ह्यात जून महिन्यातील सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून महिन्याती सरासरीच्या तुलनेत 76 टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यात 93 टक्के पावसाची नोंद झाली आहे. या उलट रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात जून महिन्यातील सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. रायगड जिल्ह्यात 102 टक्के, ठाणे जिल्ह्यात 111 टक्के तर पालघर जिल्ह्यात 123 टक्के पाऊस पडला आहे.

जून महिन्यात पालघर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान हे 329 मिलीमीटर असते, त्या तूलनेत 24 जून पर्यंत जिल्ह्यात 406 मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे जिल्ह्याचे जून महिन्याचे पर्जन्यमान 369 मिमी आहे. तिथे 411 मिमी पाऊस पडला आहे. रायगड जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी 524 मिमी पाऊस पडतो तिथे 24 जून पर्यंत 538 मिमी पाऊस पडला आहे. महिना संपायला आणखिन एक सहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण अजून वाढणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यात 24 जून पर्यंत साधारणपणे 650 मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र तिथे 610 मिमी पावसाची नोंद झाली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 जून पर्यंत 704 मिमी पावसाची नोंद होत असते. तिथे 534 मिमी पाऊस पडला आहे. राज्य सरकारच्या महारेन या संकेत स्थळावरील आकडेवारी नुसार यंदा दक्षिण कोकणाच्या तुलनेत उत्तर कोकणातील जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. पावसाचा पॅटर्न बदलला असल्याचे दिसून येत आहे.