Ticker

6/recent/ticker-posts

ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून अलिबागमध्ये ऑलिम्पिक मशाल रॅली.....



अलिबाग(रत्नाकर पाटील)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य ऑलिम्पिक मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीत रायगड जिल्ह्यातील स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी, प्रिझम संस्थेचे कार्यकर्ते, विविध शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था व खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ऑलिम्पिक चळवळीचे महत्त्व, खेळांमधील एकता आणि जागतिक बंधुत्वाचा संदेश देणारी ही रॅली अलिबाग शहराच्या प्रमुख मार्गावरून उत्साहात काढण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ऑलिम्पिक मशालीचे पूजन करण्यात आले. यावेळी  क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी, आंतरराष्ट्रीय खेळाडू पौर्णिमा सकपाल, क्रीडा मार्गदर्शक यतीराज पाटील, प्रिझम संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीत सहभागी झालेल्या खेळाडूंना, क्रीडा प्रेमींना क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर यांनी क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याकरिता शुभेच्छा दिल्या तसेच आजच्या ओलंपिक दिनाचे महत्त्व सांगितले.

या रॅलीद्वारे युवकांमध्ये क्रीडासंस्कार, शिस्त, संघभावना व आरोग्याची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे.