Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारांची बदनामी करणाऱ्यांविरोधात शिरूर पोलिसांकडे निवेदन पत्रकारांचा इशारा – संबंधितांवर कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण



शिरूर ग्रामीण प्रतिनीधी - ( शैलेश जाधव )

दैनिक पुढारीमध्ये २३ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या "शिरूर तालुका राष्ट्रवादीमध्ये मरगळ" या शीर्षकाखालील बातमीवरून तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे. या बातमीच्या अनुषंगाने शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक उपाध्यक्ष सागर खंडागळे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून संबंधित वृत्ताची आणि पत्रकारांची बदनामी केली, असा आरोप करत स्थानिक पत्रकारांनी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्याकडे निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित बातमी ही सत्य परिस्थितीवर आधारित असून, पत्रकारांनी आपले कर्तव्य पार पाडताना वस्तुनिष्ठ मांडणी केली होती. मात्र, बातमी न पटल्यामुळे सत्तेचा वापर करून पत्रकारांवर दबाव टाकणे हे लोकशाहीविरोधी कृत्य असून, पत्रकारांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला.

या वेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद ढोबळे, प्रवीण गायकवाड, अनिल सोनवणे, शैलेश जाधव आदी पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले की, अशा प्रकारच्या दबावाची परंपरा मोडून काढण्यासाठी संबंधित व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा, पत्रकार संघटनेमार्फत बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा थेट इशाराही यामध्ये देण्यात आला आहे.

पत्रकारांनी याप्रकरणी लवकरच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देणार असल्याचेही स्पष्ट केले.