Ticker

6/recent/ticker-posts

जागर श्यामच्या कथांचा"-विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे.

 


 टेंभुर्णी प्रतिनिधी  विष्णु मगर 

जाफराबाद तालुक्यातील  टेंभुर्णी  येथील नवभारत शिक्षण संस्थेच्या, श्रीमती.जे.बी. के. विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात दररोज सकाळी शाळेच्या वेळेत  "जागर श्यामच्या कथांचा" हा कथा अभिवाचनाचा कार्यक्रम घेतल्या जात आहे. "अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा. हेलस,ता.मंठा. व जालना जिल्हा. शाखा, यांच्या वतीने प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे मिळावेत म्हणून "ध्वनी मुद्रना" द्वारे परिपाठाच्या वेळी ह्या कथा विद्यार्थी अतिशय आत्मीयतेने , तन्मयतेने श्रवण करीत आहेत, महाराष्ट्रातील समाजसुधारक व मातृ हृदयी आदर्श शिक्षक पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या तुरुंगात शिक्षा भोगत असतांना १९३३ मध्ये "श्यामची आई" हे आत्मचरित्र लिहिले होते.

या आत्मचरित्रावर आचार्य. प्र.के.अत्रे यांनी १९५३ मध्ये "श्यामची आई" हा चित्रपट काढला होता, पुस्तक रूपाने व चित्रपटामुळे श्यामची आई या आत्मचरित्रातील संस्कार कथा घरा-घरात पोहोचल्या होत्या, आजच्या पिढीला सुद्धा मातेची ममता, तळमळ, आईचं प्रेम, जिव्हाळा, त्याग कळावा, आई- वडील  आपल्या लेकरांना घडवितांना कोणकोणत्या प्रसंगाला सामोरे जातात, लेकरांना चांगले संस्कार देण्यासाठी आदर्श नागरिक बनविण्यासाठी काय काय धडपड त्यांना करावी लागते हे , "श्यामच्या आईच्या कथा" श्रवण केल्याने लक्षात येते,आज प्रत्येक विद्यार्थी, पालक, कुटुंबातील प्रत्येक घटक यांनी  "श्यामची आई" ह्या आत्मचरित्रातील कथा  वाचून घेतल्या, ऐैकल्या,श्रवण केल्या, तर आदर्श समाज निर्माण होईल,

 एवढी अनमोल विचारधारा या कथांमध्ये आहे. "जागर श्यामच्या कथांचा"या उपक्रमात राजेंद्र जोशी छत्रपती संभाजीनगर , यांनी अभिवाचन निर्मिती केली असून,  उपविभागीय अधिकारी अंजली धानोरकर. छत्रपती संभाजी नगर, यांच्या अप्रतिम,सुरेल,ओघवत्या, सुंदर आवाजातील अभिवाचन ऐैकुण विद्यार्थी मंत्रमुग्ध होत आहे. या कथांमधून श्रमाचे मूल्य,आई बाबांचा जिव्हाळा, त्याग, प्रेम, करूणा, आत्मियता, कळते बहिण-भावाच्या जिव्हाळ्याचा उलगडा होतो, मित्रा-मित्रांमधिल ओढ ,आपुलकी, मैत्रीभाव कळतो, कोणतं ही काम हलकं नसतं हे सहज मनांवर बिंबविल्या जातं, "श्रम प्रतिष्ठेचा" पुरस्कार केल्या जातो, अनेक नातेसंबंधातील रेशीम पदर उलगडून दाखवले जातात, त्यामुळे दररोज सकाळी शाळेच्या वेळेत "जागर श्यामच्या कथांचा" हा उपक्रम विद्यार्थी अतिशय तल्लीनतेने श्रवण करीत आहेत, या उपक्रमाला जिल्ह्यातील विविध प्रशालेतुन उत्तम प्रतिसाद लाभत आहे. दररोजच्या परिपाठा मध्ये जवळपास ४२ कथा विद्यार्थ्यांना ऐैकायला मिळणार आहे, सकाळ च्या प्रसन्न वातावरणात श्यामच्या आईच्या कथा ऐैकून  विद्यार्थी भारावून जात आहे. प्राचार्य. नंदकुमार काळे व जेष्ठ शिक्षक एस.बी.बोरकर हे कथा अभिवाचन संपल्यानंतर, कथांचा "सारांश व बोध" याचे सुंदर,अप्रतिम विवेचन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना "जागर श्यामच्या कथांचा" हा उपक्रम अतिशय हवाहवासा व आपलासा वाटत आहे.या अभिवाचनामुळे विद्यालयातुन आदर्श विद्यार्थी घडतील असा आशावाद शिक्षक प्राध्यापक यांनी व्यक्त केला आहे.