Ticker

6/recent/ticker-posts

रानटी हत्ती पकड मोहीम पावसाळ्यानंतर नक्की राबवणार – पालकमंत्री नितेश राणे यांचा पुनःरोच्चार



प्रतिनिधी : 

दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोकेदुखी ठरलेल्या रानटी हत्तीच्या वाढत्या त्रासाला आळा बसण्यासाठी पावसाळ्यानंतर हत्ती पकड मोहीम निश्चितपणे राबवली जाईल, असा पुनःरोच्चार सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज केला.

आज हॉटेल ‘आराध्य’ येथे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्तीच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा झाली. हत्तींच्या हलचाली, अधिवास व नुकसानीच्या भागांची पाहणी "वनतारा" संस्थेच्या तज्ज्ञ टीमकडून पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले, "शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पावसाळा ओसरताच हत्ती पकड मोहीम  सुरू केली जाईल. वनविभाग, स्थानिक प्रशासन आणि तज्ज्ञांच्या मदतीने ही मोहीम परिणामकारक होईल."

दोडामार्ग परिसरात गेल्या काही महिन्यांपासून रानटी हत्ती शेतात घुसून मोठ्या प्रमाणात शेती व बागायतीचे नुकसान करत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ठोस कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे.