कोयना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
पाटण (दिनकर वाईकर )
कोयना धरण जलाशय क्षेत्रासह सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार सुरू असलेल्या पावसाने कोयना धरणाची पाणी पातळी २१३५.०१ फूट तर ७४.५९ टिएमसी झाली आहे. जलाशयातील पाणी धरणाच्या वरील वक्र दरवाजाला लागले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस, धरणामध्ये येणारी आवक आणि उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेता कोयना जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडणे आवश्यक असल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे
मंगळवार दि. १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उघडून ५००० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ७१०० क्युसेक प्रतिसेंकद पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. यामुळे कोयना नदीपात्रातील पाण्यात वाढ होणार आहे. तरी नदी काठावरील गावांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी सायंकाळी ५ वा. पर्यंत कोयना धरणातील पाणी साठा ७४.५९ टिएमसी झाला आहे. गेल्या २४ तासात रविवारी सायंकाळी ५ वा. ते सोमवारी सायंकाळी ५ वा. पर्यंत कोयना- ४९ (२२४३) मि.मी, नवजा- ७०, (२०७०) मि.मी, महाबळेश्वर- ५८, (२१४२) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
Social Plugin