कारंजा शहर पोलिसांची माहिती, शांतता समितीची बैठक उत्साहात
कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
कारंजा लाड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सर्व समाजाच्या प्रार्थनास्थळावरील भोंगे आता काढले जाणार आहे. तथापि, यादृष्टीने शहराच्या कायदा व स्वतः सुव्यवस्थेला धक्का बसू नये म्हणून म्हणून धार्मिकस्थळावरील भोंगे काढून घ्यावे असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यावर विविध समाजातील मान्यवरांनी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही सुद्धा दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता मंदिर, मशीद, बौद्ध विहार अशा प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रसंगी भोंगे लावायचे असल्यास तशी पोलिसांकडून संबंधितांना रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. याअनुषंगाने पोलीस महासंचालकांचे आदेश प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील शहर पोलिस स्टेशनच्या वतीने २४ जुलै रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला ठाणेदार शुक्ला यांनी उपस्थितांना प्रार्थनास्थळावरील ध्वनिक्षेपकसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशाची माहिती दिली.
त्यांनी सर्व समाजातील मान्यवरांना स्वतः पुढे येऊन धार्मिक स्थळावरील भोंगे काढावे. परवानगीशिवाय प्रार्थना स्थळावर भोंगे लावणे गुन्हा ठरणार असून, काही दिवसांसाठी भोंगे लावायचे असल्यास तसा पोलिसांकडे अर्ज करावा. त्यानंतर परवानगी देता येईल अशी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात उपविभागीय पोलिस अधिकारी पाडवी यांनी भोंग्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे आणि स्वतःहून प्रार्थनास्थळावरील भोंगे खाली उतरवावे असे आवाहन केले. तसेच या कारणावरून कुठेही संघर्ष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सुद्धा सांगितले.
बैठकीत मौलवी मजहर, माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर, आंबेडकर अनुयायी दिलीप रोकडे, भाजपच्या शहर अध्यक्ष प्राजक्ता माहितकर, जाकीर शेख, घनश्याम केसवानी, माजी नगराध्यक्ष विजय बगडे, प्रा. ए. एस. शेख, एकनाथ पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पोलिस कर्मचारी मिथुन सोनोने तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे प्रमुख श्याम सवाई यांनी केले. सभेला शांतता समितीचे सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते
Social Plugin