Ticker

6/recent/ticker-posts

सतरा दिवसांत सोळा चोरी; अनेक गुन्ह्यातील संशयित फरार...



नाशिक प्रतिनिधि अमन शेख, 

शहर परिसरासह निर्जन ठिकाणाहून जातांना नागरिकांसह फेरीवाले व शेतकऱ्यांना आता भीती दाटून येत आहे. कारण, सर्वत्र चेन स्नॅचिंग वगळता जबरी चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना नाहक अडवून त्यांची लूट केल्याबाबत मागील १७ दिवसांत १६ गुन्हे नोंद झाले आहेत. विशेष म्हणजे बहुतांश गुन्ह्यातील लुटारु पसार असून सरकारावाडा हद्दीत १६ जुलैच्या रात्री सीबीएस येथे एका रिक्षाचालकालाची लुटमार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत गुन्हा नोंद झाला आहे. तर, जबरी चोरीसाठी इंदिरानगर हॉटस्पॉट ठरला आहे गेल्या काही दिवसांत जबरी चोरीचे प्रकार घडल्याचा घटना अलीकडे वाढता वाढता वाढतच आहेत.

१ ते १७ जुलैपर्यंत शहरातील काही ठराविक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच या घटना घडल्या आहेत. जबरी चोरीत सराईतच चोरटे वेगवेगळा पॅटर्न वापरत असून कधी दुचाकी तर कधी पायी आणि मोपेडवरुन येत पादचारी व दुचाकीस्वारांना लक्ष करत आहेत. त्यानुसार, जबरी चोरीचे जास्त गुन्हे इंदिरानगर, नाशिकरोड, पंचवटी, अंबड, म्हसरुळ, आडगाव, सरकारवाडा आणि सातपूर येथे घडले आहेत.

बहुतांश गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद असून काही गुन्ह्यांत संशयितांना अटक करण्यात आली आहे. पण, रस्त्याने जातांना काही फेरीवाले, स्थानिक, शेतकरी, परगावाहून आलेले नागरिक व स्थानिक विक्रेते पुरते दहशतीखाली आले आहेत. त्यामुळे हा धाक कमी करण्यासाठी पोलिसांनी श्रीरामपूर, ठाणे, आंबिवली, भिवंडी आणि सिन्नरसह पंचवटीतील काही सराईत स्नॅचरवर वक्रदृष्टी टाकण्याची आवश्यकता असल्याचे पीडितांसह नागरिकांचे म्हणणे आहे.

सोनसाखळीचोरी जोरात

जबरी चोरीचे गुन्हे बाजूला ठेवले तरी दुसरीकडे चेनस्नॅचर्सने महिलांना धडकी भरविली आहे. रस्त्याने जाणाऱ्या महिला, पुरुष व विवाहितांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. यातील काही संशयित अनेक दिवसांपासून पसार आहेत. सोने वितळवून त्यांनी दागिन्यांची विक्री केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या स्वरुपाच्या गुन्हे उकलीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सतरा दिवसांतील गुन्हे नोंद

इंदिरानगर-४ नाशिकरोड-२ पंचवटी-२ अंबड-२ म्हसरुळ-१ आङगाव-१ भद्रकाली-१ सातपूर-१ गंगापूर -१ सरकारवाडा-१ एकूण-१६