शिरूर ग्रामीण प्रतिनीधी - (शैलेश जाधव)
"पुंडलीक वरदा हरि विठ्ठल!" या गजरात शिरूर शहरातील हुडको वसाहतीत देवशयनी आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावात आणि चिमुकल्यांच्या विठ्ठलप्रेमात उत्साहात साजरी करण्यात आली.सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळ आणि सुवर्णयुग महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी लहान मुला-मुलींनी विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा परिधान केली होती आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात विठ्ठलनामाचा उच्चार करत पायी दिंडी सोहळा काढण्यात आला. संपूर्ण परिसर विठ्ठलमय वातावरणाने भारलेला होता.
दिंडी संपल्यानंतर सुवर्णयुगचा राजा गणपती मंदिरासमोर विठ्ठल-रुक्मिणीची आणि गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. भक्तीमय आरतीनंतर सर्व उपस्थितांना प्रसादरुपी फराळाचे पदार्थ वाटण्यात आले.या कार्यक्रमाचे संयोजन सुवर्णयुग महिला मंडळाच्या महिलांनी केले तसेच सर्व महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सर्व व्यवस्थापन यशस्वीपणे पार पाडले.
सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळ दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असून, यामार्फत लहान मुलांमध्ये संस्कृती, भक्ती आणि सामूहिकतेची जाणीव रुजवली जाते.
Social Plugin