डॉ. कलाम फोरम आणि गोदावरी अर्बनचे संयुक्त आयोजन
राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांची जयंती अर्थातच ईद-ए-मिलादच्या पावन पर्वावर, शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. एपीजे अब्दुल कलाम फोरम, गोदावरी अर्बन बँक, सफिया - रहेमान शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि दिग्रस तालुका पत्रकार संघ यांचे वतीने रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात समाजातील सर्व जाती धर्माच्या युवक, युवती, महिला व पुरुषांनी रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ईद ए मिलादच्या पवित्र पर्वावर रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे हे डॉ. कलाम फोरमचे पाचवे वर्ष आहे. आतापर्यंत सुमारे चारशे रक्त पिशव्यांचे संकलन करुन शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांना देण्यात आल्या आहेत. शिवाय वर्षभर गरजूंना मोबाईल रक्तदाते उपलब्ध करून देण्याचे कार्यही डॉ. कलाम फोरम करीत असते.
डॉ कलाम फोरमचे मुख्य कार्यवाह मिर्झा अफजल बेग, अध्यक्ष फिरोज खान, सचिव आमीन चौहान, प्रकल्प प्रमुख फारुक अहेमद, आमीन नौरंगाबादे, कार्याध्यक्ष मिर्जा नासीर बेग, उपाध्यक्ष अजीम खान, आसिफ शेख, फारुक चव्हाण, गोदावरी अर्बन बँकेचे राहुल कोल्हे पाटील, दिग्रस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पी पी पप्पुवाले, सफिया-रहेमान शैक्षणिक, सांस्कृतिक प्रतिष्ठानचे मजहर अहेमद खान यांनी शिबिरात रक्तदान करून सक्रिय सहभाग घेण्याचे आणि शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालय (सरकारी दवाखाना) येथे सोमवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 11 ते 4 या वेळात आयोजित रक्तदान शिबिरात दिग्रसकरांनी मोठ्या संख्येत रक्तदान करून या पवित्र, जीवनदायी महान कार्यात सहभागी होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. कलाम फोरमचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. तसेच शिबिर आयोजनात गोदावरी अर्बन बँकेचे कर्मचारी, आर डी एजंट, गुरुकुल इंग्लिश स्कूलचे शरीफ शेख, प्रियंका मेमोरियलचे सदानंद आठवले, विमा सल्लागार अभय नानोटे, दिग्रस तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, लक्षवेध क्रीडा अकॅडमीचे सुरेंद्र राठोड, शारीरिक शिक्षक संघटनेचे सदस्य क्रीडा शिक्षक, शेतकरी मित्र संतोष चव्हाण, विविध पत्रकार संघटना, टॅक्सी चालक मालक संघटना, केमिस्ट संघटना, शिक्षक संघटना, विविध समाज संघटना आणि दिग्रसकर नागरिक हातभार लावत आहेत.
: दररोज 40 रक्त पिशव्यांची गरज! रक्तासाठी एका माणसाला दुसऱ्या माणसावर अवलंबून राहावे लागते. माणूसच माणसाची रक्ताची गरज भागवू शकतो. त्यामुळेच रक्तदान शिबिरे आयोजित करून मानवी रक्त गोळा केल्या जाते. गोळा केलेले रक्त आवश्यक ती प्रक्रिया करून गरजेप्रमाणे वापरले जाते. यवतमाळ येथील शासकीय रक्त पेढीला दररोज किमान 40 रक्त पेशव्यांची गरज भासते. भविष्यात रक्ताची टंचाई जाणवू नये म्हणून रक्त संकलन आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी, अपघातात जखमी झालेल्यांसाठी, प्रसुतीला आलेल्या महिलांसाठी, थलेसिमिया आणि सिकलसेलग्रस्त बालकांना रक्ताची चणचण जाणवू नये यासाठी प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान करायला हवे असे आवाहन शिबिर आयोजकांनी केले आहे.]





Social Plugin