आदमपूर:बिलोली तालुक्यातील नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील टाकळी-वझरगा भागातून वाहणाऱ्या मन्याड नदीला पूर आल्याने नदीचे पाणी सैरावैरा धावून धोकादायक मोठे विस्तीर्ण पाञ काल सायंकाळपासून सदरील भागात अवाढव्य पसरलेले होते. महामार्गावरील टाकळी गावापासून ते केरूर,बोरगांव पाटीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या.काही प्रवासी व विविध राज्यातील ट्रक,कंटेनर,वाहनचालक सायंकाळी टाकळी,अटकळी भागात अडकून पडल्याने त्यांना खिचडीची व्यवस्था परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांकडून करण्यात येत होती.
जुनी थडीसावळी,जुने गळेगांव येथील गावाभोवती पाणी शुक्रवार दि.२९ ऑगस्ट रोजी दुपारनंतर वाढत गेल्याने गावातील नागरिक जवळील आदमपूर गावी स्थलांतरीत होत होते.काही नागरिक आपल्या पाहुण्यांकडे थांबले होते.आळंदी,तुपशेळगांव,वझरगा,शेवाळा,हिप्परगा, केसराळी,सगरोळी,बोळेगांव,कार्ला,गंजगाव,हुनगुंदा,मंदरना व तालुक्यातील इतरही हजारो हेक्टर पिकांची जमीन पाण्याखाली गेल्याचे चिञ भयावह होते.काही गावात संततधार पावसामुळे जुन्या घराच्या भिंती पडत होत्या.गावोगावी रस्ते खचून गेले होते.अनेक गावांचा संपर्क तुटलेला होता. सोयाबीन, तूर, उडीद,मूग आदि सर्वदूर पिकांना पुराचा फटका बसलेला होता.हजारो एकर शेती खरडून गेल्याचे चिञ व्याकूळ करणारे असेच होते.तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांकडून प्रशासकीय अनुदानाची आगामी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.
आदमपूर गावात शेजारील स्थलांतरित जुने गळेगांव,जुनी थडीसावळी लोकांची व्यवस्था अहिल्याबाई होळकर चौक परिसरात,महादेव मंदिर,जि.प.शाळा आदि ठिकाणी व शिवानंद डोईफोडे,प्रभाकर पेंटे,माधव राहिरे, थडीसावळी सरपंच शिवचंदन अनपलवार यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.देगलूर,बिलोली भागातील व सबंध जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली.त्या त्या गाव परिसरातील पोलीस बीट जमादार, होमगार्ड,महसूल कर्मचारीवर्ग,तलाठी,ग्रामसेवक, मंडळ अधिकारी,कोतवाल,पोलीस पाटील व इतर अधिकारी वेळोवेळी पुराची पाहणी करीत होते.टाकळी येथील महामार्गावर दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगांवकर यांनी भेट दिली.काही काळ पाऊसही थांबलेला होता.लोकडोबा मंदिर,भोसग्या व आदमपूर, थडीसावळी,गळेगांव हाडोळ,भरगिरे,कोळनुरे आदि भागाकडील शेत शिवारात मन्याड च्या बॅक वाटरचा धोका पसरलेला होता.वृत्त लिहिपर्यंत नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प होती.सायंकाळी पाणी वाढल्याची चर्चा जनमानसात होती.





Social Plugin