पहुर ता जामनेर (प्रतिनिधी) :-
सामाजिक जाणिवेचे उत्कृष्ट उदाहरण देत, जामनेर तालुक्यातील पहुर येथील सुर्यदिप शिक्षण प्रसारक मंडळ शेंदूर्णी संचलित व विद्याभारती देवगिरी प्रांत संलग्नित सरस्वती प्ले स्कुल आणि विवेकविरा इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थी व शिक्षिकांनी एक राखी पोलीस दादांसाठी हा अभिनव असा उपक्रम राबविला आहे.
रक्षाबंधन या सणाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांनी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतच आपल्या हातांनी सुंदर राख्या तयार करून सामान्य जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सण, उत्सवातही आपल्या परिवारासोबत न राहता कर्तव्याला प्राधान्य देत नागरिकांच्या रक्षणासाठी व विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या पोलिसदादांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्याप्रति आपले प्रेम आणि आदर दर्शवण्यासाठी शाळेने हा उपक्रम थेट पहुर पोलीस स्टेशनमध्येच आयोजित केला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे अध्यक्ष प्रदिप गुजर आणि पहुर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार दाते साहेबानी केली. विद्यार्थिनीं, शिक्षिकांनी पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना पेढा भरवला. “आपल्या सुरक्षेसाठी, सुख-शांतीसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस बांधव कोणत्याही सण उत्सवात आपल्या परिवाराला सोडुन कर्तव्याला प्राधान्य देत दिवस-रात्र कार्यरत असतात. त्त्यामुळे यांचे आपल्यावर मोठे ऋण आहे,” असे मत संस्थेचे अध्यक्ष प्रदिप गुजर यांनी भावनिक शब्दांत व्यक्त केले.
पोलिसांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधला. त्यांनी वाहतूक नियम, गुन्हे प्रतिबंध आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले. “तुम्ही चांगले शिक्षण घ्या, समाजासाठी काम करा आणि कायद्याचे पालन करा, चांगले नागरिक व्हा, ही आमची अपेक्षा आहे,” असे पोलिस ठाणे अंमलदार दाते साहेबानी सांगितले. यावेळी पोलीस बांधवांनीही मुलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत खाऊ वाटप केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलाबद्दलचा विश्वास आणि आदर अधिक दृढ झाला. पालक व नागरिकांनीही या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे पोलीस व नागरिक यांच्यातील नाते अधिक घट्ट होते,” असे मत यावेळी पोलीस स्टेशन परिसरात उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.
शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये लहान वयातच देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी आणि त्यांना सामाजिक कार्याची जाणीव करून देण्यासाठी असे विविध वनाविन्यपूर्ण उपक्रम ही शाळा नेहमी राबवित असते.





Social Plugin