राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : भारतीय स्टेट बँक दिग्रस शाखेतील बॅंक मॅनेजर रणजित सिन्हा व बँक कर्मचारी निखिल गणवीर यांच्या मनमानी व उद्धट कारभाराविरोधात चाललेला दीर्घ संघर्ष अखेर यशस्वी झाला आहे. ग्राहकांना मानसिक छळ, अभद्र वर्तन, तसेच आर्थिक सेवेत झालेल्या गंभीर बेफिकिरीबाबत अखेर दिग्रस पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता चे कलम ३५२, ३(५) चे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हा ऐतिहासिक निर्णय मिळवून देण्यासाठी कमांडो गौतम धवने यांनी केलेल्या अथक पाठपुराव्याला यश आले असून, धवने यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून ठाणेदार वैजनाथ मूंडे यांनी धाडसी आणि निर्भीड कारवाई करत कायद्याचे खरे रूप दाखवले.
ग्राहकांचा विश्वास डळमळीत करणाऱ्या, बॅंकेतील अधिकाऱ्यांच्या हुकूमशाही पद्धतीविरुद्ध दाखल झालेला हा गुन्हा दिग्रस तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील जनतेसाठी नवा इतिहास ठरणार आहे. बॅंकेसारख्या प्रतिष्ठित संस्थेत बसलेले अधिकारी जनतेला त्रास देतात, त्यांना मानसिक छळ सहन करावा लागतो, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. मात्र याविरोधात धवने दाम्पत्याने घेतलेली ठाम भूमिका आणि न्यायासाठी दाखवलेली जिद्द सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे.
ही कारवाई स्पष्ट करते की अन्याय करणाऱ्यांचे बळ कितीही मोठे असले तरी जनतेचा आवाज दडपता येत नाही. सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्याला अखेर न्याय मिळतोच.आज दिग्रस शहरात सर्वत्र चर्चा रंगली आहे की, “गुन्हा दाखल होणे हे फक्त एका व्यक्तीच्या न्यायासाठी नसून संपूर्ण ग्राहक वर्गाच्या विजयाचे प्रतीक आहे.” हा विजय फक्त धवने दाम्पत्याचा नाहीतर प्रत्येक सामान्य माणसाचा आहे जो आपल्या हक्कांसाठी लढतो. पुढील तपास ठाणेदार वैजनाथ मूंडे करीत आहे.





Social Plugin