Ticker

6/recent/ticker-posts

मोहाडी नदीला पूर; आलेवाडीत शेतपिकांचे मोठे नुकसान – पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी



प्रतिनिधी – निळकंठ वसू | आलेवाडी, 


आलेवाडी परिसरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाबाहेरून वाहणाऱ्या मोहाडी नदीला अचानक पूर आला. नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावरील शेतात पाणी शिरून खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडले असून, त्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी महसूल विभागाकडे केली आहे.


पुरामुळे प्रामुख्याने कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः श्री. मधुसूदन पाटील वानखडे व श्री. देवानंद पाटील वानखडे यांची शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, त्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.


नुकसानग्रस्त शेतकरी श्री. मधुसूदन पाटील वानखडे यांनी सांगितले, “रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने मोहाडी नदीला पूर आला. शेतातील कपाशी पीक पूर्णपणे वाहून गेले आहे. मेहनत व खर्च वाया गेला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.”


श्री. देवानंद पाटील वानखडे म्हणाले, “आमच्या शेतात कपाशी पीक होते. पण पुराच्या पाण्याने ते पूर्णपणे नष्ट झाले. आता आम्हाला कर्जफेडीची चिंता भेडसावत आहे. सरकारने आम्हाला योग्य मदत करावी.”


शेतकऱ्यांनी महसूल विभागाचे अधिकारी व तलाठी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करावेत आणि योग्य ते मदतीचे पाऊल उचलावे, अशी मागणी केली आहे.


स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे