"कोठडीतील मृत्यू प्रकरणाला वाचा फुटली; आरोपी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडवर गुन्हा" दाखल...
"सगळे गप्प, पण बाळासाहेब आंबेडकर लढले – कोठडीतील खुनाला न्याय मिळवणारा लढा"
"राजकीय पक्षांनी सोडलं, पण संविधानाने साथ दिली – विजयाबाईंची लढाई न्यायाच्या वळणावर"
प्रतिनिधी :- उत्तम पाईकराव
दिवसाढवळ्या एका तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू होतो आणि प्रशासन त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतो, पण एका आईच्या स्वाभिमानाने आणि वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या कायदेशीर लढ्यामुळे अखेर न्यायाच्या मार्गावर पहिला पाऊल पडले आहे. परभणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यात 2 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजता पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड याच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना 15 डिसेंबर 2024 रोजीची. 14 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालातही "शॉक ड्युटु ट्रॉमा" म्हणजे जबर मारहाणीचा उल्लेख आहे.
दरम्यान, पोलिसांनी मृत्यूचं कारण ‘हार्ट अटॅक’ सांगितलं आणि आर्थिक मदतीसह दुसऱ्या मुलाला पोलीस भरतीत घेऊ अशी लालच दिली, असा आरोप विजयाबाई यांनी केला आहे. मात्र, सत्य उघड झालं. घाटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात मारहाणीचं कारण स्पष्ट झालं, आणि सीसीटीव्ही फुटेजमधून एलसीबी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडच्या पथकाने सूर्यवंशी यांना पोलीस ठाण्यात आणल्याचं स्पष्ट झालं.
या प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांकडून तथ्य दडपण्याचा प्रयत्न झाला, राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक बनसोड यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उलट दावा केला होता की कोठडीत कोणतीही मारहाण झाली नव्हती. पण फुटेज, पोलिस डायऱ्यांतील नोंदी आणि घटनांच्या कालक्रमानुसार पोलिसांचा हा खोटारडेपणा उघड झाला.
या प्रकरणात विशेष लक्ष वेधून घेतलं ते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचं भूमिका. त्यांनी विजयाबाईंना भावाप्रमाणे आधार दिला. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जेव्हा महाराष्ट्र शासनाने आणि पोलीस प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात आदेशाला आव्हान दिलं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने ठामपणे सांगितलं की आरोपीचे नाव माहित नसले तरी एफआयआर नोंद होऊ शकतो.
या निर्णयाच्या आधारे कलम 103(1) अंतर्गत गुन्हा क्रमांक 343/2025 नुसार गुन्हा दाखल झाला. हा निकाल एक इतिहास घडवणारा ठरला आहे.आज जेव्हा विजयाबाई म्हणतात की, "मी कोणतीही सरकारी मदत घेतली नाही, मला पैसा नाही, मला न्याय पाहिजे! माझ्या मुलाला मारणाऱ्याला फासावर लटकवले पाहिजे!" – तेव्हा एक स्वाभिमानी आई संविधानाच्या जोरावर अन्यायाविरुद्ध लढा देते याचं ज्वलंत उदाहरण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं.
राज्य शासन, पोलिस यंत्रणा, आणि बहुतेक सर्व राजकीय पक्ष गप्प राहिले, पण बाळासाहेब आंबेडकर या लढ्याला अखेरपर्यंत साथ देणारे एकमेव नेते ठरले.हा लढा केवळ एका आईचा नव्हता, तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलिसांविरोधात संविधानाचा विश्वास ठेवून लढणाऱ्या जनतेचा होता.
आज विजयाबाई आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलं की – संविधानाचे अस्तित्व आहे, आणि अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते – जर न्यायासाठी ठाम उभं राहिलं, तर.
Sun, Aug 3, 6:15 PM (18 hours ago)
Social Plugin