Ticker

6/recent/ticker-posts

उमरखेड शहरात नागरी सुविधा कोलमडल्या; नगर परिषदेच्या कारभारावर नागरिकांतून तीव्र नाराजी



बाळासाहेब पवार उमरखेड (प्रतिनिधी): 

उमरखेड नगर परिषदेच्या निष्क्रीय कारभारामुळे शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शहरातील बहुतांश भागात सांडपाण्याच्या नाल्यांची कोणतीही साफसफाई न झाल्यामुळे, पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असून, रस्त्यावर पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

विशेषतः पुसद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कॉम्प्लेक्स परिसर, ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. या परिसरातील नाली पूर्णपणे गाळाने भरून गेल्याने, पावसाचे पाणी साचून जवळपास गुडघ्याएवढा तलाव निर्माण झालेला आहे. याच परिसरात अनेक खाजगी शिकवणी वर्ग चालत असल्यामुळे, तसेच याच परिसरात बहुतांश शाळा व विद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास आणि सुरक्षिततेस मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्ता आणि नाली यातील फरक ओळखता न आल्यामुळे वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुले नाल्यात पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.

यासंदर्भात अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करूनही, नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. नागरिकांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपरिषदेमार्फत मात्र, घरोघरी तसेच व्यापारी आस्थापनांवर जाऊन सक्तीची कर वसुली सुरू आहे.

"नगरपरिषद नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरत असताना, कर वसुली करणे म्हणजे अन्यायकारक आहे," अशी तीव्र भावना जनतेतून व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्तरावर ही बाब जनमानसात चांगलीच चर्चेत असून, नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


"आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या, निवेदने दिली, पण नगर परिषद प्रशासन झोपेत आहे. रस्त्यावर पाणी साचते, मुलं घसरून पडतात, आजारी पडतात, तरीही कोणालाही काही फरक पडत नाही," अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.