बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही पपू श्री हनुमानगिरी महाराज यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्ताने श्री सेवागिरी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. श्री सेवागिरी मंदिराच्या प्रांगणात दि. १८ ते २४ ऑगस्ट या सप्ताहात रोज सायंकाळी साडेपाच वाजता ही व्याख्यानमाला होईल, अशी माहिती देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.
श्री सेवागिरी व्याख्यानमालेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. सोमवारी (ता. १८) प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे 'स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावर व्याख्यान होईल. मंगळवारी (ता. १९) प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांचे 'ग्रामीण जीवनातील कविता व रसिक साहित्यप्रेमी श्रोत्यांना प्रबोधन' या विषयावर, बुधवारी (ता. २०) मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. केशव सखाराम देशमुख यांचे 'ज्ञानाची किंमत आणि श्रमाचे फळ' या विषयावर, गुरुवारी (ता. २१) ज्येष्ठ विचारवंत सुनील देवधर यांचे 'अखंड राष्ट्रीयत्व' या विषयावर, शुक्रवारी (ता. २२) पुण्याचे प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांचे 'एक भाकर तीन चुली' या विषयावर व्याख्यान होईल. शनिवारी (ता. २३) अभिनेते अरुण नलावडे यांची 'प्रकट मुलाखत' होईल. रविवारी (ता. २४) निवृत्त सनदी अधिकारी अविनाश सुभेदार हे 'प्रशासकीय सेवेतील आव्हाने' या विषयावर व्याख्यान देतील.
सोमवारी (ता. २५) पपू श्री हनुमानगिरी महाराज यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ११ वाजता समाधीस महाभिषेक, मंत्रपुष्पांजली, आरती व नंतर महाप्रसाद होईल. व्याख्यानमालेच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने विशेष परिश्रम घेत आहेत. चौकट=अपूर्व पर्वणी असलेल्या व्याख्यानमालेचे संयोजन येत्या सोमवार ते रविवार (ता. २४) या सप्ताहात केले आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा.- डॉ. सुरेश जाधव, अध्यक्ष, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट





Social Plugin