Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावात रविवारी रंगणार ५ लाखांची दहीहंडी; श्री सेवागिरी रयत संघटनेकडून आयोजन



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव  येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री सेवागिरी रयत संघटनेच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. १७) सायंकाळी सहा वाजता या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल. हंडी फोडणाऱ्या पथकाला ५ लाख रुपये रोख बक्षिस दिले जाईल, अशी माहिती श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांनी दिली.

श्री. जाधव यांनी सांगितले की, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे ५ लाखांचे रोख बक्षीस पटकावण्यासाठी यंदा पुसेगावात गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, शिरवळ, वाई, मेढा तसेच पुसेगाव व पंचक्रोशीतील पथके सहभागी होणार आहेत. महिलांचे विशेष गोविंदा पथक देखील सहभागी होणार आहे.

दहीहंडीला मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री ठरलं तर मग फेम सायली उर्फ जुई गडकरी यांसह विविध सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत. या दहीहंडीमध्ये महाराष्ट्रातील नामांकित लावणीतारका सहभागी होणार असून त्यांचाही नृत्याविष्कार पाहण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे . यावेळी डॉल्बी साउंड आणि स्पेशल लाईट सोबतच फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रथमच खटाव-पुसेगाव भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे नियोजन केले गेले आहे.

दरम्यान,  पुसेगावात रंगणाऱ्या या दहीहंडी सोहळ्यासाठी शिस्तबध्द नियोजन करण्यात आलेे आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव देखील होणार आहे. दहीहंडीचा आनंद आणि थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रयत संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.