Ticker

6/recent/ticker-posts

अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महडचा वरदविनायक



कैलासराजे घरत खारपाडा पेण 

वरदविनायक (महड) हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते. 

गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रद्रश्त्ये व गणानं त्वा या मंत्राचे प्रवर्तक ऋषी गृत्समद यांनी श्री वरदविनायकाची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींनी आपल्या मातेला श्राप दिला होता. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी येथील अरण्यात ओम गं गणपतये नमः या मंत्राचा अनेक वर्षे जप केला. गणेश प्रसन्न झाल्यावर त्यांनी गणेशास प्रार्थना केली की त्यांनी येथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास वरद विनायक म्हटले जाऊ लागले. या मंदिराबाबत एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या माणसाने शोध घेतला व त्याला मूर्ती मिळाली. त्याच मूर्तीची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. भाविकांसाठी २४ तास उघडे असणारे हे एकमेव देऊळ आहे.

 शिवाय दुपारी १२ पर्यंत स्वहस्ते गणेशाची पूजा करता येते. मंदिरात १८९२ पासून सतत नंदादीप तेवत आहे. भक्तांना वर देणारा वरदविनायक. १७२५ साली पेशवे काळात हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर कौलारू, घुमटकर असून पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दोन-दोन हत्ती कोरलेले आहेत. मंदिराच्या पश्चिमेला देवाचे तळे आहे तर उत्तरेला गोमुख आहे. मंदिरावर नागाची नक्षी असलेला सोन्याचा कळस आहे. मंदिराला दगडी नक्षीकाम केलेली महिरप असून गाभा-यात वरदविनायकाची दगडी सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. पुण्यातील पेशवे हे थोर गणेशभक्त होते. माधवराव पेशव्यांचे थेऊरला निधन झाल्यावर त्यांना सती गेलेल्या रमाबाईंची समाधी तेथे आहे. मंदिराच्या आवारात थोरल्या माधवरावांची कारकीर्द वर्णन करणारे कलात्मक दालन आहे. हे दालन निरगुडकर फौंडेशनच्या वतीने तयार करण्यात आले आहे.