धर्माबाद: डीआयजियो इंडिया यांच्या सहकार्याने आणि इंडो-ग्लोबल सोशल सर्विस सोसायटी यांच्या वतीने, उमेद अभियान आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या विशेष सहभागाने, धर्माबाद तालुक्यातील महिला व युवकांसाठी 'एकात्मिक जल, स्वच्छता आणि पर्यावरण विकास कार्यक्रमा' अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, मत्स्यपालन- मत्स्यव्यवसाय आणि ग्रामीण उद्योजकतेवर मार्गदर्शन करण्यात आले.
दिनांक १३ ऑगस्ट २०२५, रोजी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सहभागींची नोंदणी आणि वेलकम किट वाटपाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी काशीनाथ बडेहवेली, तालुका उमेद अभियान व्यवस्थापक माधव भिसे आणि प्रीती कोल्हे, कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य व्यवस्थापक व्यंकट शिंदे, तसेच मत्स्यव्यवसाय संस्थेचे जिल्हाध्यक्ष रमेश कुंभारे उपस्थित होते. पुष्पगुच्छ आणि किट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
अक्षय श्रीकंठवार (प्रकल्प समन्वयक, IGSSS) यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याबद्दल आणि प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्दिष्टांबद्दल माहिती दिली. त्यानंतर माधव भिसे यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व विशद करून उमेद अभियानाच्या कार्यावर प्रकाश टाकला. मत्स्यव्यवसायाच्या माध्यमातून महिलांना उपजीविकेची साधने कशी उपलब्ध होऊ शकतात, यावर काशीनाथ बडेहवेली यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अक्षय श्रीकंठवार यांनी महिला, युवक आणि ग्रामीण उद्योजकतेचा संबंध स्पष्ट करताना जल, स्वच्छता आणि उद्योगाच्या संधींवर चर्चा केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, सहभागी महिलांनी कृषी विज्ञान केंद्रातील विविध प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व सहभागींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. गोविंद खुळखुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर संगीता भालेराव यांनी नोंदणी व प्रमाणपत्र वितरणाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित प्रमुख पाहुणे आणि सर्व सहभागींचे आभार फेरोज शेख यांनी मानले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम धर्माबाद तालुक्यातील महिला आणि युवकांना आत्मनिर्भर होण्यासाठी आणि ग्रामीण उद्योजकतेच्या संधी ओळखण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला.
Social Plugin