अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून,या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या एका तलाठ्यास अटक करण्यात आली आहे.
जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासानुसार,आरोपी शिवाजी श्रीधर ढालके,जो उंबरी बाजार,ता.दरियापूर,जि.अमरावती येथील तलाठी आहे,याने पीक मदतीच्या यादीत ४० हून अधिक बोगस नावे टाकून आर्थिक लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.आरोपीला ११ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून,तो सध्या पोलीस कोठडीत आहे.या गैरव्यवहारात एकूण २ कोटी ४९ लाख ७० हजार ७८१ रुपयांचा अपहार झाल्याचा अंदाज आहे.
या प्रकरणी पोलीस चौकशीत तलाठी शिवाजी ढालके याने इतर काही एजंट आणि सहाय्यकांचा वापर करून हे काम सोपे केले.यामध्ये,खाजगी सहाय्यक मनोज शेषराव उघडे आणि साहेबराव उत्तमराव तुपे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी या दोघांनाही काल रात्री अटक केली असून,त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या गुन्ह्यात सहभागी असलेल्या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
यापूर्वी या प्रकरणात सहाय्यक महसूल अधिकारी सुशीलकुमार दिनकर जाधव यांनाही अटक करण्यात आली असून ते सध्या जिल्हा कारागृहात आहेत.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३१६(४),३१६(५),३१८(४),३२४(५), ३३६(३),३३८,३४०(२),३३९,२३८,३(५) BNS आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५२,५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Social Plugin