Ticker

6/recent/ticker-posts

जायकवाडीतून तब्बल २ लाख २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग




 परतुर  प्रतिनिधी:- लक्ष्मण बिल्हारे

गोदावरी नदीवरील जायकवाडी (नाथसागर) धरणातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाने धरणाचे सर्व दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात १ लाख १३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता परंतु आज दुपारपासून जायकवाडीतून तब्बल २ लाख २५ हजार क्युसेक इतक्या प्रचंड अर्थात दुप्पट पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहणार असून, नदीकाठच्या सर्व गावांना अतिसतर्कतेचा इशारा अर्थात रेड अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली असली तरी अशा गंभीर परिस्थितीमध्ये सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. 

जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून जायकवाडी धरणाची पाणी पातळी पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली आहे. गोदावरी नदीच्या उगम क्षेत्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या गंगापूर, दारणा, आणि मुळा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. जायकवाडी धरणात पाण्याची प्रचंड आवक सुरू आहे. या क्षणी जायकवाडी धरणात पाण्याची आवक २.५० लाख क्युसेकपेक्षा जास्त होत असल्याने, धरणाचे सुरक्षित पातळी राखण्यासाठी विसर्ग वाढवणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे २.२५ लाख क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अशी माहिती देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली.