अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड पुरवठा निरीक्षक,गोदाम व्यवस्थापकासह लिपिकांची पदे वर्षभरापासून रिक्त; एकीकडे 'शासन आपल्या दारी' म्हणत योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा दावा करत आहे,तर दुसरीकडे अंबड तालुक्याचा संपूर्ण पुरवठा विभागाचा डोलारा केवळ एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर आहे.गेल्या एका वर्षापासून निरीक्षण अधिकारी (नायब तहसीलदार पुरवठा) हे एकटेच संपूर्ण तालुक्याचा कारभार सांभाळत असून,तब्बल ५ महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आला आहे.याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या कामांवर होत असून,रेशन कार्ड व इतर शासकीय योजनांच्या लाभासाठी त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
अंबड तहसील कार्यालयात सध्या पुरवठा विभागात निरीक्षण अधिकारी (नायब तहसीलदार) हे एकमेव अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त पुरवठा निरीक्षक आणि गोदाम व्यवस्थापक ही दोन महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर पीएलए खाते लिपिक,कार्ड लिपिक आणि रेशन कार्ड लिपिक अशी कनिष्ठ लिपिकांची तीन पदेही भरलेली नाहीत.यामुळे कार्यालयीन कामांपासून ते क्षेत्रीय स्तरावरील तपासणीपर्यंतची सर्व जबाबदारी एकाच अधिकाऱ्याला पार पाडावी लागत आहे.
मनुष्यबळाअभावी रेशन कार्ड बनवणे,नावे कमी करणे किंवा वाढवणे,तक्रारींचे निवारण करणे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे अशा सर्व कामांना मोठा विलंब होत आहे.क्षेत्रीय स्तरावरील कामांसाठी आणि तपासणीसाठी जाण्यात निरीक्षण अधिकाऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत,ज्यामुळे कामात सुसूत्रता राखणे कठीण झाले आहे.विशेष म्हणजे,महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) कनिष्ठ लिपिक पदासाठीची कागदपत्र तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.मात्र,अद्याप उमेदवारांना नियुक्त्या देऊन पदस्थापना करण्यात आलेली नाही.अंबड तालुक्याला या भरतीतून एकही कर्मचारी मिळालेला नाही,ज्यामुळे रिक्त पदांचा प्रश्न 'जैसे थे' आहे.
त्यामुळे सामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नसून त्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने आणि संबंधित विभागाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन अंबड पुरवठा विभागातील सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत,अशी मागणी जोर धरत आहे.जेणेकरून कामात सुसूत्रता येऊन नागरिकांना दिलासा मिळेल.





Social Plugin