अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाने शासकीय कर्मचाऱ्यांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सुमारे ४० किलोमीटरच्या थरारक पाठलागानंतर हा ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यानंतर स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने चालकाला पकडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार,दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गौणखनिज चोरीची माहिती मिळाल्यानंतर महसूल प्रशासनाने कारवाईसाठी पथके रवाना केली.हस्तपोखरी भागात तपासणी करत असताना,एका ट्रॅक्टरमध्ये अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता,ट्रॅक्टर चालक सचिन जगताप (रा.घोटण) याने ट्रॅक्टर मालक सुरजीत खंडेकर(रा.काजळा) असल्याचे सांगितले.
अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी थांबण्याचा प्रयत्न केला असता,चालकाने त्यांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर तहसीलदार विजय चव्हाण आणि कैलास गायकवाड यांनी या ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला. हा पाठलाग कर्जत च्या दिशेने सुरू असताना, चालकाने अधिकाऱ्यांना थांबण्यास नकार दिला. 'पुढे आल्यास ट्रॅक्टर अंगावर घालू'अशी धमकी देत त्याने अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
जवळपास ४० किलोमीटरच्या थरारक पाठलागानंतर अखेर धनगर पिंपरी गावामध्ये ट्रॅक्टर पलटी झाला.त्यानंतर,स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने महसूल प्रशासनाच्या पथकाने चालकाला ताब्यात घेतले.ट्रॅक्टर जप्त करून तो तहसिल कार्यालयात आणण्यात आला.
या घटनेची माहिती तात्काळ मा जिल्हाधिकारी अशिमाजी मित्तल,अतिरिक्त जिल्हाधिकारी रिताजी मेत्रेवार आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांतजी पारधी यांना देण्यात आली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणात गौणखनिज चोरी आणि वाहतूक करणाऱ्या इतर लोकांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.यावर दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.बदनापूर तहसीलदार आणि अंबड पोलिसांनीही या कारवाईत सहकार्य केले.





Social Plugin