बुध दि. [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल, पुसेगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शाळेच्या प्रांगणात सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी सेवागिरी महाराज आणि डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, संस्था सचिव श्री. मोहनराव जाधव, संस्था विश्वस्त योगेशराव देशमुख , विश्वस्त श्री. सूर्यकांत जाधव, स्कूलचे प्रशासकीय अधिकारी तथा माजी प्राचार्य श्री. डी. पी. शिंदे व मुख्याध्यापिका कु. धनश्री पोतदार , पर्यवेक्षक श्री ठोंबरे सर यांच्या हस्ते प्ले ग्रुप ते इ. 10 वी पर्यंतच्या नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांनी औक्षण करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. चॉकलेट व स्टार्स देण्यात आले. शाळेचा परिसर फुग्यांनी व रांगोळीने सजवण्यात आला होता. “शाळा आपली दुसरी आई” या थीमवर आधारित फलकांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्पोर्ट्स क्लबचे उद्घाटनही करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका कु. धनश्री पोतदार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमची शाळा कटिबद्ध आहे. इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षणासोबतच संस्कार व मूल्यशिक्षणावरही भर दिला जाणार आहे. *वेगवेगळ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालेले आहे. लीड अभ्यासक्रमातील खटाव तालुक्यातील ही एकमेव शाळा आहे. परिसरातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश आमच्या शाळेत करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक , शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद स्पष्ट दिसत होता. शाळेत झालेल्या वेगवेगळ्या गोष्टींची पाहणी करून पालकांनीही शाळेच्या या वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती भंडारी यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर ठोंबरे सर यांनी केले. शेवटी वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.
> *संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले की, "आधुनिक सुविधा व अनुभवी शिक्षकवृंद असलेल्या या शाळेत परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे."*





Social Plugin