Ticker

6/recent/ticker-posts

*“आयुर्वेद ही फक्त औषधपद्धती नसून जीवन जगण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे”–डॉ. प्रशांत खरात



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्या फाउंडेशन व ओम साई क्लिनिक,त्रिमूर्ती चौक छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य आयुर्वेद आरोग्य शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले.या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात नामवंत डॉ.प्रशांत खरात यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.त्यांनी एकूण १०० हून अधिक रुग्णांची तपासणी करून योग्य उपचार दिले.तसेच रुग्णांना आयुर्वेद पद्धतीनुसार निरोगी राहण्यासाठी आवश्यक अशा आहार, दिनचर्या,योग आणि मानसिक संतुलन यांचे महत्त्व समजावून सांगितले.

डॉ.खरात यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले –“आयुर्वेद ही केवळ रोगनिवारणाची औषधपद्धती नाही.ती जीवन कसे निरोगी व संतुलित जगावे,यासाठीची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे.योग्य आहार-विहार,योग्य विचार व शिस्तबद्ध दिनचर्या पाळल्यास औषधांची गरजच भासत नाही.त्यामुळे प्रत्येकाने आयुर्वेद हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग करून घ्यावा.”शिबिरादरम्यान रुग्णांना त्यांच्या आजारांवर योग्य मार्गदर्शनासोबतच भविष्यात आरोग्य समस्यांपासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक जीवनशैलीचे नियम सांगण्यात आले.यामध्ये संतुलित आहार,योगासने,प्राणायाम,तसेच मनःशांती राखण्याच्या तंत्रांचा विशेष उल्लेख करण्यात आला.

या शिबिराच्या आयोजनात हेल्थ मित्र तेजस भगवत,रोहित खोटकर,शुभम ताबे,प्राजक्ता कजळे व ऋषिकेश धनायत यांनी महत्वाची भूमिका बजावली.रुग्णांची नोंदणी, तपासणी व औषध वितरणाची व्यवस्था या स्वयंसेवकांनी उत्तमरीत्या पार पाडली.

संपूर्ण शिबिराचा उद्देश नागरिकांमध्ये आयुर्वेदाविषयी जागरूकता निर्माण करणे,तसेच सर्वांगीण आरोग्याकडे सकारात्मक दृष्टीकोन वाढवणे हा होता.नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला आणि उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.

 या शिबिरामुळे सहभागी नागरिकांमध्ये आयुर्वेदाबद्दल विश्वास व जागरूकता अधिक दृढ झाली असून,“आरोग्य हीच खरी संपत्ती” या विचाराला नवी दिशा मिळाली.