जिशान सय्यद मंगरुळ, दि. 18 सप्टेंबर 2025
ज्ञानवर्धिनी विद्यालय मगरूळ ता. जळकोट जि. लातूर येथील स्काऊट-गाईड मधील सहभागी विद्यार्थी यांनी समाजकार्याची परंपरा पुढे नेत आज एक स्तुत्य उपक्रम राबवला.मंगरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा निर्माण झाल्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडण्याचा धोका वाढला होता. नागरिकांनी अनेकदा या संदर्भात तक्रार केली होती. मात्र, तत्काळ उपाययोजना होण्याआधीच विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी पुढाकार घेत श्रमदानातून खड्डा बुजवून दुरुस्त केला.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवत माती व दगडांच्या साहाय्याने खड्डा व्यवस्थित बुजवला. त्यामुळे आता रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संदीप हरमुजे म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण व जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. आज विद्यार्थ्यांनी समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे.”नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले असून, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आता धोका कमी झाल्याने दिलासा मिळाल्याचे मत व्यक्त केले.
ज्ञानवर्धिनी विद्यालयातील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांचे हे श्रमदान समाजासाठी आदर्श ठरत असून, “सामाजिक जबाबदारीची जाणीव असणारा विद्यार्थीच खऱ्या अर्थाने देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल करतो” असा संदेश देऊन गेले आहे.
यावेळी स्काऊट गाईड शिक्षक प्रमुख बोडके सर केदार सर असिफ पटेल व विद्यार्थी हजर होते





Social Plugin