Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर ते धनगर पिंपरीकडे मशाल घेऊन पायी चालत निघालेल्या भाविकांचे उत्साहात होते स्वागत



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी तुळजापूरला जाणाऱ्या धनगर पिंपरी गावातील ग्रामस्थांनी यावर्षीही आपली परंपरा कायम ठेवली आहे.गावातील सुमारे ३० भाविक मशाल घेऊन पायी तुळजापूरहून धनगर पिंपरीकडे निघाले आहेत.या श्रद्धाळू भाविकांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत होत आहे.

धनगर पिंपरीच्या ग्रामस्थांचा हा पायी मशाल सोहळा गेली अनेक वर्षे सुरू आहे.श्रद्धेचे प्रतीक मानली जाणारी ही मशाल घेऊन भाविक मोठ्या भक्तिभावाने पायी चालत आहेत.या प्रवासात ते देवीची भजने आणि पारंपरिक गीते गात आहेत,ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. वाटेत अनेक गावांमध्ये स्थानिक रहिवाशी या भाविकांचे स्वागत करत आहेत.त्यांच्यासाठी पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्थाही केली जात आहे.

यावर्षीचा हा सोहळा सोमवारी (२२ सप्टेंबर) धनगर पिंपरी गावात पोहोचेल अशी अपेक्षा आहे.त्यापूर्वी,भाविक येडेश्वरी देवी आणि मत्स्योदरी देवीचे दर्शन घेणार आहेत.गावात पोहोचल्यानंतर देवीची विधिवत प्रतिष्ठापना केली जाईल. हा सोहळा केवळ एक धार्मिक यात्रा नसून,गावकऱ्यांच्या एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनला आहे.