Ticker

6/recent/ticker-posts

श्री मत्स्योदरी देवी नवरात्र महोत्सव-२०२५ आढावा बैठक तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

 मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या मत्स्योदरी देवी मातेच्या नवरात्र महोत्सव सन-२०२५ ची आढावा बैठक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह अंबड येथे पार पडली.या बैठकीस संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार श्री. विजय चव्हाण अध्यक्षस्थानी होते.या बैठकीस वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरमवाड,पोलीस निरीक्षक श्री.संतोष घोडके, महावितरण कंपनीचे शहर अभियंता,नगरपरिषद कर्मचारी श्री.परमेश्वर शिंदे,औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य व संस्थान व्यवस्थापक श्री.कैलास शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षक श्री संतोष घोडके यांनी नवरात्र महोत्सव काळात वाहन पार्किंग,वाहतुकीची व्यवस्था आणि रस्त्यावरील अडचणी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाकडून विशेष पथके तैनात करण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.बैठकीत तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले की नवरात्र उत्सवाला मोठ्या प्रमाणावर भाविक देवी दर्शनासाठी येतात.त्यामुळे कोणत्याही भाविकाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे.आरोग्य सुविधा,पिण्याचे पाणी,स्वच्छता,वीजपुरवठा तसेच सुरक्षा यावर विशेष लक्ष द्यावे.नवरात्र महोत्सवाच्या काळात भाविक भक्तांना आरोग्य सुविधा,वीजपुरवठा, स्वच्छता,वाहतूक नियंत्रण,पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळाव्यात,यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.