अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
प्राचार्य डॉ.भारतभूषण शास्त्री भानुकवी (अंबड,जि. जालना) यांना कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक तर्फे “सर्वज्ञश्रीचक्रधरोक्त ब्रह्मविद्याशास्त्रग्रन्थस्य समीक्षणात्मकम् अध्ययनम्” या संशोधन कार्यावरून पी एच डी (विद्यावारिधी) या सर्वोच्च शैक्षणिक पदवीने गौरविण्यात आले.महानुभाव संस्कृत साहित्यातून आणि तेही संस्कृत माध्यमातून मिळालेली ही पहिलीच पी एच डी असल्याने ही संपूर्ण महानुभाव संप्रदायासाठी आणि भारतीय दार्शनिक क्षेत्रासाठी मोलाची कामगिरी ठरली आहे.३०० पानी संशोधन प्रबंध पूर्णपणे संस्कृत भाषेत तयार केला असून त्याचे मार्गदर्शन साहित्याचार्य ब्रह्मविद्या वाचस्पती श्रीऋषीराजशास्त्रीजी महानुभाव–मामाजी (वांबोरी) यांनी केले.
संशोधन प्रक्रियेत संस्कृत भाषा संकाय अधिष्ठाता डॉ. कविता होले,विभागप्रमुख डॉ.पराग जोशी,मार्गदर्शक डॉ. राजेंद्र जैन आणि परीक्षक डॉ.विनयकुमार उपाध्याय यांच्या उपस्थितीत पदवी प्रदान समारंभ पार पडला.या प्रबंधात सोळाव्या शतकातील महानुभाव आचार्य पंडित चक्रपाणी व्यास बिडकर यांच्या संस्कृत सूत्रपाठावर ब्रह्मविद्येतील पाचही प्रकरणांचे सविस्तर भाष्य केले आहे.प्रो मधुसूदन पेन्ना (संस्कृत अकादमी,हैद्राबाद) यांच्या मार्गदर्शनाखाली मूळ शुद्ध सूत्रपाठ तयार करून महानुभाव तत्त्वज्ञानाची सैद्धांतिक मांडणी साकारण्यात आली.
मराठी व संस्कृत भाषेतील समन्वय,प्रादेशिक भाषांमधून संस्कृतमध्ये अनुवादाची परंपरा तसेच महाराष्ट्रातील संस्कृतचे आद्यत्व महानुभाव परंपरेत असल्याचे मुद्दे या संशोधनातून अधोरेखित झाले आहेत.दहिपुरी या छोट्याशा गावातून प्रवास सुरू करून कै.आचार्य भानुकवी (पंचकृष्ण ज्ञानाश्रम,अंबड) व कै.पांडुरंग मिसाळ यांच्या प्रेरणेने शास्त्रींनी आश्रम पद्धतीने महानुभाव शास्त्राचे शिक्षण घेतले.पुढे श्रीचक्रधर गुरुकुल,नागपूर विद्यापीठ व रामटेक येथील संस्कृत विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.या यशामुळे महानुभाव संप्रदायाच्या वैदिक वाङ्मयातील अभ्यासाची नवी वाट खुली झाली असून,डॉ.भारतभूषण शास्त्री यांचा हा शोधनिबंध भारतीय तत्त्वज्ञान क्षेत्रात महत्वाचा ठरणार आहे.





Social Plugin