राष्ट्रीय पत्रकार संघ भारत, बिलोलीतर्फे तहसिलदारांना निवेदन
बिलोली प्रतिनिधी – गणेश कदम
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पत्रकार संघ भारत, बिलोली शाखेच्या वतीने कठोर निषेध नोंदविण्यात आला. या संदर्भात तहसिलदार गजानन शिंदे तसेच नायब तहसिलदार मेठेवाड यांना निवेदन देण्यात आले असून, सर्व दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. २० सप्टेंबर रोजी ‘झी २४ तास’चे ब्युरो चीफ योगेश खरे, ‘साम टीव्ही’चे अभिजित सोनवणे आणि ‘पुढारी न्यूज’चे किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला चढवला होता. या घटनेत ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हा प्रकार हा फक्त पत्रकारांवर नव्हे, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला गंभीर आघात असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारने अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ठोस धोरण राबवावे, प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार संरक्षणासाठी स्वतंत्र सेल स्थापन करावा, अशी मागणी निवेदनात मांडली आहे. निवेदन सादर करताना राष्ट्रीय पत्रकार संघ भारत बिलोली शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिरगिरे, उपाध्यक्ष विलास शेरे, सचिव दयानंद भद्रे, सहसचिव गौतम गावंडे, संघटक गौतम वाघमारे, कार्याध्यक्ष कपिल भेदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार संघटनेने मुख्यमंत्री यांना आवाहन केले की, दोषींना कठोर शिक्षा देऊन पत्रकारांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे. पत्रकार भयमुक्त वातावरणात कार्य करू शकतील अशी ठोस हमी शासनाने द्यावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली.





Social Plugin