पालघर, प्रतिनिधी धनेश क्षिरसागर :
बोईसरमधील पास्थळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नित्यानंद हॉटेल जवळ सध्या अक्षरशः कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या कडेला व वसाहतीजवळ मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून त्यातून दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि रोगांचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी याकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
कचऱ्यामध्ये प्लास्टिक, घरगुती व औद्योगिक कचरा, खाद्यपदार्थांचे अवशेष अशा सर्व प्रकारचा कचरा साचलेला आहे. पावसाळ्यात या घाणीत पाणी साचून डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथरोगांचा गंभीर धोका निर्माण झाला असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक रहिवाशांचा संताप व्यक्त करताना म्हणाले – “ग्रामपंचायत कर वसूल करण्यात पुढे असते, पण स्वच्छतेकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केले जाते. आमच्या आरोग्याचा खेळ चालला आहे. इतका कचरा असूनही अधिकारी ठोस पावले का उचलत नाहीत?”
परिसरात भटक्या कुत्र्यांचा व डुकरांचा वावर वाढल्याने मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराविरोधात नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
नागरिकांचा इशारा : जर ग्रामपंचायतीने तातडीने पावले उचलून कचरा व्यवस्थापन सुधरवले नाही, तर मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची तयारी सुरू आहे.





Social Plugin