डॉ. सुरेश जाधव; पुसेगावच्या ग्रामसभेत निर्धार, सहकार्याचे आवाहन
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी महाराज पुसेगावमध्ये १९०५ मध्ये दिवाळीच्या दरम्यान दाखल झाले होते. हे प्रमाण मानून यंदाच्या दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी प्रकटदिन साजरा करण्याचा मानस आहे. श्री सेवागिरींचा महिमा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पोहोचला आहे. त्यामुळे श्री सेवागिरींचा पहिला प्रकटदिन नावीन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी केले.
श्री सेवागिरी मंदिरातील प. पू. नारायणगिरी भक्त निवास हॉल येथे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रकटदिन सोहळ्याच्या नियोजनासाठी ग्रामसभा झाली.त्या वेळी बोलत याप्रसंगी ते होते. मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी प्रकटदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांविषयी मार्गदर्शन केले, तसेच या दिवशी भाविकांनी घरोघरी रांगोळी काढून गुढी उभारण्याचे आवाहन केले.
विश्वस्त संतोष वाघ यांनी श्री सेवागिरींच्या पादुकांना येरळा स्नान घालून त्या व्यासपीठावर मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात याव्यात, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात गावातील तरुण आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी ट्रस्टने प्रयत्न करावेत, अशी सूचना माजी चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी केली. माजी चेअरमन जगनशेठ जाधव, दिलीप बाचल, पृथ्वीराज जाधव आणि ग्रामस्थांनी सूचना मांडल्या.
दरम्यान, श्री सेवागिरी महाराजांचे भाविक देशभर आहेत. त्यामुळे प्रकटदिन सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमाचे नेटके नियोजन ग्रामस्थांच्या मदतीने केले जाईल, असे मत विश्वस्तांनी व्यक्त केले. विश्वस्त रणधीर जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
सचिव विशाल माने यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जाधव यांनी आभार मानले.





Social Plugin