Ticker

6/recent/ticker-posts

रानडुकरांकडून पिकांचे नुकसान



खटावच्या उत्तर भागातील परिस्थिती; शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे]  

सध्या सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात रानडुकरांच्या हैदोसामुळे उत्तर खटावच्या डोंगराळ भागातील काही शेतकऱ्यांचे दिवसेंदिवस मेहनत करून उभे केलेले पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे.

लल्गुण, नवलेवाडी तसेच उत्तर खटावच्या डोंगराळ भागात रानडुकरांचे कळप मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. हे कळप शेतातील काढणीस आलेल्या खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. मका आणि उसाच्या पिकात शिरून मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. मका आणि भुईमूग पिकात तर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हैराण झाले असून, रानडुकरांपासून पिकांच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजना करत रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत.

या भागात गेल्या दोन-तीन वर्षांपासून रानडुकरांचा त्रास वाढला आहे; पण वन विभाग त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नाही. रानडुक्कर संरक्षित प्राणी असल्याने त्याची शिकार करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे शेतकरी रानडुक्कर मारू शकत नाहीत. रानडुकरांची प्रचंड पैदास वाढल्याने हा त्रास होत आहे. त्यामुळे उत्तर खटावच्या डोंगराळ भागांत रानडुकरांच्या त्रासापासून नुकसान होणाऱ्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने उपाययोजना राबवाव्यात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.                       

पंचनामा करावाया परिसरात घेवडा, सोयाबीन, बटाटा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. या परिसरात रानडुकरांकडून पिके फस्त होत आहेत. यामुळे मोठे नुकसान होत आहे. याव,र्षी कृषी, वन व तलाठी यांनी पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.        

रात्रंदिवस खडा पहारा करून पिकांचे रक्षण करावे लागत असून, एखाद्या वेळेस थोडा डोळा जरी लागला तरी पूर्ण पीक होत्याचे नव्हते होते. रानडुकरांनी अनेक वेळा शेतकऱ्यावर हल्ला केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. वन विभागाने तत्काळ रानडुकरांचा बंदोबस्त करावा.- अभिजित घाडगे, शेतकरी ललगुण.